इर्शाळवाडी दरड दुर्घटना अजितदादा ॲक्शन मोडमध्ये

रायगड : खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी गावावर काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला २१ जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली ६० ते ७० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. अजितदादांनी लागलीच परिस्थिती नियंत्रणासाठी आपत्कालीन कक्षात धाव घेतली. त्यानंतर विधिमंडळात अजित पवार यांनी निवेदनही दिलं.

अजित पवार यांनी दिलेली माहिती
इर्शाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरवर इर्शाळगडाच्या पायथायशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता उपलब्ध नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागते. वाडीत ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. गेल्या तीन दिवसात (दि. १७ जुलै ते १९ जुलै) इथे ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

काल रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. ११.३० च्या सुमारास जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. रात्री १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षास माहिती मिळाली.

इर्शाळ वाडी ही चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगर दरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. ही वाडी उंच दुर्गम अशा डोंगरावर इर्शाळ गडाच्या डोंगर कपारीत वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावे लागते. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही.

मुंबईपासून ८० किमी अंतरावर आहे. दूरध्वनी/मोबाईलने संपर्क साधणेही कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचा आदिवासी समाज या वाडीत राहतो. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी या ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकरच्या घटना घडलेल्या नाहीत.

प्रामुख्याने ठाकर समाजाची ४८ कुटुंब असून २२८ इतकी लोकसंख्या असलेली वाडी आहे. त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर २१ जण जखमी असून त्यापैकी १७ जणांवर तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले असून सहा जणांना पनवेल येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत.

शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

मी स्वत: रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Team Global: