‘झी स्टुडिओची प्रेक्षकांना खास भेट, राज ठाकरेंच्या आवाजात घुमणार ‘हर हर महादेव! ची महागर्जना

 

मुंबई | सह्याद्रीच्या कडेकपारातून , सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला ! या गर्जेनशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.

आज छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती ! हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे कारण ही महागर्जना आता मोठ्या पडद्यावरून एका भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून घुमणार असून याचा पहिला लुक खास व्यक्तीच्या आवाजात प्रसिद्ध झाला आहे/

आजवर प्रेक्षकांना एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजने या दिवाळीत प्रेक्षकांसाठी एक खास नजराणा आणला आहे ! अभिजित शिरीष देशपांडे लिखित- दिग्दर्शित, झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा महासिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे .

या चित्रपटाचा एक विशेष आवाज लाभलेला खास टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राज ठाकरे यांच्या धीरगंभीर आवाजाने सजलेली ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची ही विशेष झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

Team Global News Marathi: