ओबीसी आरक्षणावरून भुजबळ- फडणवीसांमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटलं

 

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा दिवस असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, असे आवाहन केले. हाच मुद्दा धरत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली.

भुजबळ म्हणाले, फडणवीस हे ओबीसींच्या पाठीमागे उभे आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही. एकमेकांमध्ये दुरी निर्माण करण्याऐवजी, भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि हा विषय सोडवू. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं माझ्याकडे आहे. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे

त्यावरून फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर देत म्हंटल की, ओबीसी आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही बैठकीला येतो. परंतु बैठकीत जे ठरवलं जातं ते पुढे का जात नाही? वैयक्तिक तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु मंत्री म्हणून तुम्हाला सरकारचा पाठिंबा आहे का? सरकार ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतंय का? असा सवाल फडणवीसांनी भुजबळ यांना केला.

Team Global News Marathi: