तरुण मित्र मैत्रिणींनो…प्रेमात पडताय.. मग हे नक्की वाचा

तरुण मित्र मैत्रिणींनो…प्रेमात पडताय.. मग हे नक्की वाचा

आजकाल प्रेमात पडणं जणू फॅशनच झाली आहे.फिल्मि स्टाईल मारत तरूण तरूणी प्रेमात पडतात.ते काल्पनिक विश्व आणि आपलं वास्तव विश्व याची फारकत होऊ लागली की, लगेच यांचं प्रेम संपतं.सुरू होते मग नवी शोध मोहीम.खर तर हा लकी ड्रा सारखा प्रकार झाला आहे.कधी मुलगा फसवणूक करतो.तर कधी मुलगी फसवणूक करते.तर पालक आड येतात.

परवाच एक मुलगा म्हणाला, मॅडम प्रेमात मुलीचं फसवणूक करतात.घरच्यांचा विरोध दिसला की लगेच पलटी मारतात.मी हसुन म्हणाले,अरे पुरुष प्रधान संस्कृतीत मुलींना आजही पालकांच्या बंधनात रहावं लागतं.पळून जाऊन लग्न करण्याचं धैर्य सर्व प्रेमी युगलांमध्ये नसतं.पण आजकाल मुलगा फसवतो की मुलगी यापेक्षा प्रेमात निष्ठा कमी आणि फसवणूक जास्त होतं आहे.पण का?याचाही विचार होणं गरजेचं आहे.

एक तर केवळ प्रेमावर जीवन जगता येतं नाही.प्रेमात पडणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं असतं.हेच तरुण पिढीला समजतं नाही.आईबापाच्या पैशावर रोमांस करत फिरणं म्हणजेच प्रेम अशीच काहीशी गोड समजूत तरुण पिढीची असते.कुठेतरी वाचलेलं उदाहरण….एक मुलगा केवळ प्रेयशीच्या प्रेरणेने यु.पी.एस.सी.परीक्षा पास झाला.आणि ती मुलगी सी.ए.झाली.नंतर दोघांनी लग्न केलं.याला म्हणतात,प्रेमाला शक्ती बनवणं.प्रेमाची परिभाषा समजून घेऊन प्रेम करणं.

आजकाल मुला मुलींना प्रेम म्हणजे केवळ खेळ वाटतो.पण बाळांनो या खेळात तुम्ही एकमेकांचं जीवन उद्ध्वस्त करता.जरा विचार करा.तुमच्या फसवणुकीमुळे कोणीतरी आयुष्य संपवू शकतं.प्रेमावरचा लोकांचा विश्वास उडू शकतो.तुमची पिढी प्रेमापेक्षा भौतिक गोष्टीं, गिफ्ट यातच जास्त अडकते.कित्येक मुली आज पैशासाठी मुलांना फसवतात.मुलं लैंगिक सुखासाठी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.प्रेमाच्या नावाखाली असं घडतं असेल तर समाज तरी तुम्हाला का समजून घेईल?

म्हणूनच माझी तरुण पिढीला नम्र विनंती आहे की,कृपया प्रेमाला कलंक लागेल असं वागू नका.प्रेम माणसाला घडवतं.आणि जगणं शिकवतं.आणि तेच प्रेम असतं.जिथंअपेक्षा, व्यवहार येतो तिथं प्रेम नसतंच.पडताय प्रेमात…. अवश्य पडा…पण डोळे उघडे ठेवून.नाहीतर खुशाल खड्ड्यात पडा.

तुमच्या थिल्लरपणा मुळे लोकं सरळ सरळ म्हणणार आजची तरुण पिढी वाया जात आहे.प्रेमाला कलंकित करीत आहे.लैला मजनूच्या नुमत्या गप्पा मारु नका.तसं प्रेमही करा.नाहीतर त्यात पडूच नका.कारण तुमच्या खेळामुळे कोणीतरी संपून जातं.असं आदर्श प्रेम करा की, इतरांनी तुमच्या कडे बोट दाखवलं पाहिजे.प्रेमात निष्ठा हवी.एकमेकाविषयी आदर हवा.तरच ते प्रेम यशस्वी होतं.मुलींनाही कळकळीची विनंती…कृपया एखाद्या गरीब मुलाच आयुष्य, करिअर बरबाद करु नका.

समाजात कितीतरी उदाहरणे घडली आहेत की, श्रीमंत मुलगी घरच्यांच्या विरोधाला बळी पडते.आणि त्या मुलाचं,त्याच्या कुटुंबाचं नाहकच अस्तित्व संपतं.अशांना मी सरळ सरळ म्हणेन की, तुम्ही प्रेमाच्या वाटेवर जाऊ नका.पालकांनी देखील आपल्या पाल्यांना समजून घ्याव.कोणाच तरी आयुष्य उद्ध्वस्त करायला आपणही तितकेच जबाबदार असता.

म्हणूनच माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आधी प्रेमाची परिभाषा समजून घ्या.प्रेम आणि करिअर यांची सांगड घाला.आणि स्वत:च्या हिमतीवर प्रेम यशस्वी करा.फिल्मी भूलभुलैया यात अडकू नका.फिल्मी प्रेम आणि वास्तव प्रेम यात फरक असतो.फिल्मी प्रेम तीन तासाचंच असतं.पण तुमचं प्रेम आयुष्यभर टिकवायचं असतं.

सौ.सुधा पाटील सांगली (8459730502)

ग्लोबल न्युज नेटवर्क: