प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक अन् ५३ पुरस्कार

प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक अन् ५३ पुरस्कार

आयकर विभागाचे सह आयुक्त विठ्ठल भोसले यांनी लिहिले कथानक

बार्शी:    पुणे आयकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल भोसले यांनी कथा व दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या’ या मराठी चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक झाले आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुता लागून राहिली आहे.

सकारात्मकतेचं बिज पेरणारा ‘फिरस्त्या‘  चित्रपट हा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत  यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या‘ ने  भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया  या ११  देशांमधील  २४ आंततराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण ५३ पुरस्कार जिंकलेले आहेत.

 

यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट- १८ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- १७ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- ७ पुरस्कार, सर्वाेत्कृष्ट पटकथा – ५ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ३ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण- २ पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट  संकलन १असे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच  ‘फिरस्त्या‘ ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की   या ४ देशांमधील ४  चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

चित्रपटाचे लेखक आणि  दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेट वर उपलब्ध माहिती आणि यु -ट्यूब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे. भोसले यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी हे आहे.

निर्माती डॉ.स्वप्ना भोसले यांनी ‘झुंजार मोशन पिक्चर्स संस्थेद्वारे ‘फिरस्त्या‘ची निर्मिती केलेली आहे. चित्रपटाचे प्रमुख  कलाकार  हे बार्शीचे सुपुत्र समीर परांजपे, हरीश बारसकर,  मयुरी कापडने आणि अंजली जोगळेकर आहेत.  प्रमुख बाल कलाकार आज्ञेश मुडशिंगकर, श्रावणी अभंग व  समर्थ जाधव आहेत.

‘फिरस्त्या‘ साठी  पाश्र्व गायन  आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत दिग्दर्शन  रोहित नागभिडे, देवदत्त मनिषा बाजी, पाश्र्व संगीत   रोहित नागभिडे, गीतकार   गुरु ठाकूर आणि  वैभव देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, ध्वनी संयोजन राजेंद्र त्यागी यांनी केले आहे. संघर्षातून यशोशिखराकडे जाणाऱ्या नायकाची गोष्ट असलेला ‘फिरस्त्या’ पाहण्यासाठी आता मराठी रसिक श्रोतेही उत्सुक आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: