दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त रजनीकांत यांचा जीवन संघर्ष आपणास माहिती नसेल; त्यासाठी हे वाचाच

नवी दिल्ली: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल सुपरस्टार  रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या अभिनयाने मोठे नाव कमावले आहे. त्यांचे हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमधले अनेक चित्रपट  विक्रमी  ठरले आहेत. त्यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीतला सर्वात प्रतिष्ठेचा  मानला जाणारा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री  प्रकाश जावडेकर  यांनी दिली आहे. या निमित्ताने जाणून घेऊया रजनीकांत यांच्याबद्दल काही खास गोष्टी.

रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. आज ते जिथे आहेत तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. भारतीय चित्रपटातील सुपरस्टार असलेले रजनीकांत एकेकाळी बस कंडक्टर होते. लहानपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागली. रजनीकांत बेंगळुरू परिवहन सेवेत बस कंडक्टरची नोकरीही करत असत.

कंडक्टर म्हणून काम करतानाच घेतले अभिनयाचे प्रशिक्षण

बस कंडक्टर म्हणून काम करत असतानाही रजनीकांत यांना आधीपासूनच असलेला अभिनयातला रस कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी 1973 साली मद्रास चित्रपट संस्थेत नाव दाखल केले आणि अभिनयाचे धडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली. दिग्गज निर्माते-दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्यांचे कौशल्य पाहून त्यांना अपूर्वा रावंगल या तमिळ चित्रपटात संधी दिली आणि त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातला त्यांचा अभिनय गाजला. यानंतर सुरुवातीला त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. नंतर त्यांना नायकाच्या भूमिका मिळू लागल्या आणि पाहता पाहता लोक अक्षरशः त्यांची पूजा करू लागले.

80च्या दशकात केले बॉलिवुडमध्ये पदार्पण

रजनीकांत यांनी 80 च्या दशकात बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यांनी 1983 मध्ये अंधा कानून या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातला त्यांचा अभिनयही गाजला. यानंतर त्यांनी ‘जीत हमारी’, ‘मेरी अदालत’, ‘वफादार’, ‘गिरफ्तार’, ‘असली नकली’, ‘हम’ आणि ‘बुलंदी’ यासह अनेक बॉलिवुड चित्रपटांमध्ये काम केले. आज रजनीकांत हे आशियातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: