मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाल्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाला अनेकांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मात्र, शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहे.
शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष आणि आमदार तसेच नगरसवेक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा सर्वांत मोठा धक्का आहे. शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष तसेच अभिनेता सुशांत शेलार हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदेंच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे सुशांत शेलार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतर्फे राज्यातील विविध मुद्द्यांवर निषेध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्च्याला पाठ फिरवत ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे शिंदे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे ते दोघेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.