चिंताजनक : मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच, सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) आता अधिक वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) झपाट्याने वाढतेय. मुंबईत तर सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची वेग अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. फक्त समाधानकारक बाब ही की रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 हजार 318 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत सध्या 1 लाख 6 हजार 37 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 7 लाख 70 हजार 56 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 86 टक्के आहे.

सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा जास्त रुग्ण

दरम्यान, 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारापेक्षा अधिक आहे.

मॉल, चित्रपटगृहांवर पुन्हा निर्बंध?

मिळालेल्या माहितीनुसार राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मॉल आणि चित्रपटगृहांवर निर्बंध येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा ब्रेक द चेननुसार निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसंच मार्चपर्यंत कोरोना निधीची तयारी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: