स्त्रीचं लैंगिक स्वातंत्र्य….वाचा सविस्तर-

स्त्रीचं लैंगिक स्वातंत्र्य….वाचा सविस्तर-

अर्ध जग हे स्त्रियांचं असतं, तर उर्वरित अर्ध जग हे स्त्रियांपासूनचं असतं! असं असलं तरी स्त्रीची समाजातलं महत्त्व आणि तिच्या भाव भावनांना समाजातली किंमत ही अगदीच नगण्य आहे.. आपल्या साऱ्याच गोष्टी पुरुषप्रधान आहेत.. तर मग लैंगिकता याला अपवाद कशी असेल?


सेक्स ही आयुष्यातली एकदमच दुय्यम गोष्ट असून त्याचा इतका विचार करणेच गैर आहे (किंबहुना त्या गोष्टी विचार करण्यालायकच नसतात) असंच आपल्याला संस्कृती शिकवते..

पण आहार, निद्रा आणि मैथुन या बेसिक इन्स्टिक्ट (अंतःप्रेरणा) आहेत, आणि त्या आपण थोपवू शकत नाहीत, उलट त्यांचे योग्य नियमन (Regulation) केल्यास त्याचा वापर आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी करू शकतो असं मानसोपचारशास्त्र सांगतं.. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण व्यक्तीची वर्तणूक, व्यक्तिमत्त्व, सवयी आणि प्रगती या सगळ्या गोंष्टींवर त्या व्यक्तीच्या “Psychosexual development”चा प्रभाव असतो, असं सायकीयाट्री सांगते.

त्याबाबतीत आपण जितके लैंगिकतेचे नियम खुलेपणाने स्वीकारू आणि कौन्सिलिंगच्या साहाय्याने ते जाणून घेऊ तितकी “निकोपता” आपण आपल्यात आणि आपल्या पुढच्या पिढीत आणू शकू, असं मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे..

खरंतर, रूढी परंपरांनी आणि धार्मिक बंधनांनी स्त्रीला मुद्दाम तसे (लैंगिक बाबतीत लाजाळू वगैरे) बनवले आहे.. कामुकतेला हीन समजलं आहे आणि तिचे दमन करण्याच्या विचारांचा उदोउदो केला आहे.. त्या जोखडांमुळे स्त्रीची कितीही (लैंगिक) ‘घुसमट’ झाली तरी ती व्यक्त होत नाही/नसेल.. पण म्हणून ती satisfied आहे असा त्याचा अर्थ होत नाही.

“पतीचं सुख हेच तुझ्या जीवनाचं सार्थक” असं युगानुयुगे बिंबवल्याने, स्वतःच्या लैंगिक तृप्तीबाबत विचार करणे किंवा त्याबद्दल वाचणे आणि लैंगिक इच्छांच्या नियमनासाठी ‘वेगळा’ विचार करणे हे आताच्या (२१व्या शतकातील भारतीय) स्त्रियांना देखील नकोसे वाटते, ते पाप वाटते.. याचाच तर आपल्याला नव्याने विचार करायचाय..

विवाह संस्थेमुळे व्यवस्था उत्तरोत्तर ‘पुरुषांकरिता’ होत जाणे आणि स्त्रीच्या कौमार्याचे, चारित्र्याचे नवे स्तोम माजवले जाणे, यामुळे स्त्रियांच्या लैंगिक भावनांचा (sexual Desire and its satisfaction) विचार कोणी केलाच नाही.. उलट समाजाचे नैतिक अधःपतन होईल म्हणून स्त्रीलाच शारीरिक आणि मानसिकरित्या ‘झाकून ठेवणे’ योग्य समजले, तिच्या भावनांचा आणि तृप्तीचा विचार ठेचून टाकला आहे.. आणि स्त्रियांना देखील युगानुयुगे याची सवय झाल्याने “कौमार्य (व्हर्जिनिटी) आणि शील हाच खरा दागिना” असं वाटू लागलं.. त्यांच्या सणावरांत आणि खाजगी वर्तुळात पण त्यांनी यालाच अवास्तव महत्त्व देणं सुरू केलं.

 

खरंतर, स्त्रीने अथवा पुरुषाने एकापेक्षा अनेक जोडीदारांसोबत (विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य) शारीरिक जवळीक केली तर, त्या कृतीनंतर त्यांच्यात शारीरिकदृष्ट्या किंवा जीवशास्त्रीयदृष्ट्या काहीच फरक पडत नसतो.. किंवा वेगळं विशेष काही होत नसतं.. लैंगिक कृत्ये केल्यास शरीर विटाळणं, किंवा शरीरसंबंध आल्यास ती स्त्री ‘सेकंड हॅन्ड’ होणं, तिचं शील भ्रष्ट होणं ह्या सुमार दर्जाच्या तर्कहीन कल्पना आहेत.

 

स्त्रीच्या कोणत्या गुणांना महत्व द्यावं? हुशारी, धडाडी, आत्मविश्वास, शिक्षण या गुणांपेक्षा तिच्या “शिलाला” अवास्तव महत्व येण्याचं कारण याच तर्कहीन कल्पना आहेत.. पुरुषाने कितीही शरीरसंबंध ठेवले तर काही नाही (उलट तो मर्द!), पण स्त्रीने तसं केलं तर तिचं कॅरॅक्टर खराब होतं.. म्हणजे नेमकं काय होतं?!

या असल्या नीच धारणांमुळे तर आजही बलात्कार पीडित स्त्री कितीही सक्षम असली तरी पूर्वीइतक्या सन्मानाने पुन्हा जगू शकत नाही, तिचा उल्लेख ‘तिच्यावर अत्याचार झालाय’ असा करण्याऐवजी ‘तिची अब्रू लुटली गेली’ असा केला जाणे, हे याच दर्जाहीन विचारांचे बायप्रॉडक्ट आहे.

स्त्री उच्चपदस्थ जरी असली किंवा मंत्री जरी झाली तरी तीचं ‘चारित्र्य’ हेच तिचं समाजातलं खरं स्थान ठरवतं.. तिनं काही कॉन्ट्रोव्हर्सि केली की लगेच पुरुषांनी “बाई वाड्यावर या” म्हणणं आणि स्त्रियांनी पण ‘ती त्यातलीच आहे’ असं म्हणणं आणि सगळ्यांनी मिळून तिचे फोटोशॉप फिरवणं, यातच आपली किडलेली मानसिकता दिसते.

एकटी स्त्री आपलाच ‘माल’ वाटणे, विधवा स्त्री ‘वापरलेली’ वाटणे, कुमारी मातेला (दुसऱ्या स्त्रीकडून देखील) इज्जत न मिळणे, मुलांशी अजिबात न बोलणाऱ्या मुलींना स्वतःलाच आपण ‘लय भारी’ आहोत असं वाटणे आणि मुलांशी मोकळेपणाने बोलणाऱ्या मुली मात्र ‘तसल्या’ वाटणे, लग्नासाठी नवरोबाची कौमार्याची अट असणे.. या सगळ्या गोष्टी स्त्रीच्या शील, चारित्र्याला आणि तिच्या अवयवांना नको तितके महत्व देणाऱ्या विचारसरणीचे बायप्रॉडक्ट आहेत.. या सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत.

आपल्याला हे सगळं बदलायचं असेल तर सारी मानसिकताच मुळापासून बदलावी लागेल.. पुरुष गर्दीत वा अंधारात स्त्रीची छेडछाड करण्याची संधी का शोधतात? एरव्ही नॉर्मल असलेली माणसे अचानक पाशवी बलात्कार कसे करू शकतात? फॅशनच्या नावाखाली स्त्रिया अंगप्रदर्शन करण्याच्या आहारी का जातात? स्त्रीपुरुष सायकोसेक्सूअल आजारांनी त्रस्त का असतात? होर्डिंगवरचे स्त्रीशरीर आपल्याला मिटक्या मारत का पाहावे वाटते? राखी सावंतचे चुंबन असो किंवा ब्रिटनचा रॉयल किस असो, भारतीय स्क्रीनवर भडिमाराने हे का दाखवले जाते? या प्रश्नांचा आज ‘नव्याने’ विचार करण्याची गरज आहे.

मी स्वतःच्या मर्जीने कोणाशी शरीरसंबंध ठेवले तर माझ्या ‘शील’ नावाच्या काचेच्या भांड्याला तडा जात असतो, आणि माझं सो कॉल्ड ‘कॅरॅक्टर’ खराब होत असतं, या गैरसमजातून स्त्रियांनाचं पहिलं बाहेर यावं लागेल.. आपल्या आतापर्यंतच्या नैतिकतेच्या कल्पना पुन्हा नव्याने ‘सेट’ कराव्या लागतील.. ‘स्त्रीची इज्जत ही तिच्या दोन पायांच्या मध्ये असते’ वगैरे पारंपरिक विचार आपल्या डोक्यातून काढून टाकावे लागतील.. स्त्रियांनी स्वतः पण ‘मुँह काला करणं’, ‘पाऊल वाकडं पडणं’, यावर टोमणे बंद करायला हवेत.

मला सांगा, नाक्यावर मुलींना छेडत बसणाऱ्या किती मुलांना त्यांच्या आया कानाखाली देतात बरं? आपल्याकडे कितीतरी आया मुलांना गावभर उंडारायला सोडतात आणि मुलीला मात्र अगदी बंधनात वाढवतात.. मुलींना ‘स्वतःला जप’ हे शिक्षण देणाऱ्या किती आया मुलांना पण ‘नीट वाग’ हे शिकवतात..? आपणही आपला मुलगा लहानाचा मोठा करून एक ‘निर्ढावलेला वळू’ बनवून या जगावर सोडतो आहोत याचे भान नसते का बरं स्त्रियांना..?

आपल्याला कुठलंही स्वातंत्र्य हवं असेल तर त्याची जबाबदारी ही आपल्यालाच उचलावी लागेल, हे स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे.. आणि त्याची सुरुवात आपल्याच घरातून करावी लागणार आहे याचीही तयारी ठेवली पाहिजे.

आणि हा बदल लगेच नाही होणार.. पण त्या दिशेनी प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे ना? मुक्त विचारसरणीच्या व्यक्तींचं कौतुक करणं.. कुठल्याही मुलीला तिच्या चरित्र्यावरून जज न करणं.. कौमार्य आणि शील यावरून संशय न घेणं, तशा अपेक्षाही न करणं.. वैवाहिक जीवनात आणि विवाहपूर्व पण कौन्सिलिंगचा आधार घेणं.

लैंगिक शिक्षण सुरू करण्यासाठी समाजात अनुकूलता निर्माण करणं, सरकारकडे त्याचा पाठपुरावा करणं.. अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या लेव्हलवर करू शकतो.. आपल्या चार पाच पिढ्या जातीलही त्यात.. पण त्या दृष्टीने पावलं आजच टाकायला हवीत.. नाहीतर, ‘तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची नाही’ ही आपली पारंपरिक सवय याबाबतीत मात्र आपल्याला खूप महागात पडेल.

– डॉ सचिन लांडगे.
drsachinlandge@gmail.com

 

साभार तुफान

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: