शेतीवर आलेल्या कोरोना संकटावर मात करणारी स्त्री-योद्धा

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उध्दारी अशी सुप्रसिद्ध म्हण मराठीत आहे. स्त्री शक्तीने बदलाची आणि कष्टाची भूमिका दाखवली तर शेती किती उध्दारु शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ. सीमा जाधव. पॅकिंगमधलं अन्न खाताना आपल्याला वेगळा अनुभव येत असतो तसंच पॅकिंगमधील शेतमाल विक्रीचा यशस्वी प्रयोग त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंबळी येथे यशस्वीपणे राबविला आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे शेतकरी अडचणीत असताना मात्र दुसरीकडे सीमाताईंनी यशस्वीपणे थेट शेतमालविक्रीचा प्रयोग राबविला आहे.

बऱ्याचदा शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन जरी होत असले तरी शेतीमाल विक्री व्यवस्थेत आपला हातखंडा नसेल तर अनेकदा शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी बऱ्याचदा अडचणीत आलेला दिसतो. शेतीतील संकटावर प्रभावी मात करून सिमा जाधव यांनी शेतमालाची विक्री व्यवस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि पुढे शेतक्रांती आयुष्यात झाली.

गेल्या चार ते पाच वर्षापासून शेतातील माल विक्रीसाठी स्वतःहा पुढे येऊन काम करत आहेत. त्यामुळे स्वतःच्या शेतातील परदेशी भाजीपाल्यासह, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचीही त्या विक्री करत आहेत. त्यासाठी सामोऱ्या येणाऱ्या विविध अडचणी शोधून त्या त्यावर मात करत पुढे जात आहेत.

उत्पादित शेतीमाल विक्री समस्या ?
सीमा जाधव यांच्याकडे साधारणपणे तीन एकर शेती आहे. यामध्ये दोडका, अळू, मेथी, कोथंबीर, काकडी, मिरची अशा विविध प्रकारचा भाजीपाला घेत आहे. याशिवाय परदेशी भाजीपाल्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, आईसबर्ग या प्रकारचा भाजीपाला घेत आहेत. मात्र, उत्पादित मालाची विक्री करताना अनेक अडचणी त्यांना वेळोवेळी येत होत्या.

त्या अजूनही येत आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी एवढ्या मेहनतीने पिकविलेला शेतमाल विक्रीचा मोठा प्रश्न होता. सर्व बाजारपेठा त्या काळात बंद होत्या भाजी हा प्रकार नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत होती. हे सर्व नुकसान टाळण्यासाठी त्यांनी संबधित शेतकरी महिला, पुरुष यांच्याशी चर्चा करून यांच्या सर्व शेतमाल गोळा करून तो विक्रीचा निर्णय घेतला.

थेट शेतमाल विक्रीसाठी पाऊले

मागील अनेक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने भाजी विक्री करत असल्यामुळे थेट ग्राहकापर्यंत कसे जायचे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे लाँकडाऊन काळातही अनेक अडचणी असतानाही मागे न सरता शहरातील विविध सोसायटीधारकांना भाजीपाला विक्रीसाठी पुढाकार घेऊन थेट विक्री सुरू केली. सुरूवातीला चार ते पाच दिवस ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र, ग्राहकांची असलेली गरज ओळखून हळूहळू पॅकिगमध्ये शेतमाल देण्यास सुरूवात त्यांनी केली. दर्जा टिकवत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहिला आणि नंतर वाढल्याने शेतमालाची विक्री चांगली होत गेली.

शहरातील सोसायटीमध्ये थेट विक्री 
सीमा जाधव यांनी पुण्यातील काही निवडक सोसायटीच्या सदस्यांशी फोनवरून संपर्क साधून भाज्या कशा पद्धतीने ताज्या व उत्तम प्रतीचा आहे. हे ग्राहक वर्गाला समजून देण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले. ग्राहकांची भाजीची ऑर्डर ऑनलाईन पद्धतीने व्हाट्सअँपद्वारे घेऊन शेतकऱ्यांना तशी भाज्याची काढणी करावयास सांगून तो शेतमाल खरेदी करून तो शेतमाल विविध पद्धतीने ग्रेडिंग, पॅकिंग करून पुण्यातील विविध सहा हौसिंग सोसायटीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री त्यांनी स्वतः केली आहे.

शेतमाल पॅकिंगमध्ये अनुकूनल

गेल्या ते पाच वर्षापासून भाजी पॅकिंगसाठी बारदाना पोती तसेच गोणीचा वापर त्या करत होते. परंतु हे पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील ग्राहक वर्गाला हे पटत नव्हते. म्हणून त्यांनी पॅकिंगमध्ये बदल केला. तो शेतमाल आता एका कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो माल ग्राहकांना देण्यास सुरूवात केली. त्यामुळे पॅकिग व ताजा माल थेट ग्राहकांना मिळत असल्याने चांगलाच प्रतिसाद वाढत गेला.

पतींची साथ लाख मोलाची

शेतमालाच्या विक्रीसाठी पुढाकार घेतल्यानंतर शेतमालाच्या वाहतुकीसाठी व माल उचलण्यासाठी महिला म्हणून त्यांना बऱ्याचदा मर्यादा येत होत्या. म्हणून या कामासाठी त्यांनी पती श्री. चंद्रकांत जाधव यांची मदत घेतली. या कामामध्ये त्यांनी शेतमाल गोळा करणे, विविध भाज्यांची प्रतवारी, गाडी चालविणे, भाजी गाडीत भरणे किंवा खाली करणे यासारखी कामे केली या सर्व कामात त्यांची मुले त्यांना मदत करतात . शेतमालाच्या वाहतुकीसाठी एक वाहक गाडी घेतली आहे. त्यामुळे वाहतुकीचा समस्या त्यांना आता भेडसावत नाही. उलट यामुळे ग्राहकांना खूप कमी वेळेत ताजा माल पोहच करणे अतिशय सोपे झाले.

थेट शेतमाल विक्रीतून ६०० ग्राहकांचा टप्पा पार

       
लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरातील ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळणेही कठीण झाले होते. शहरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे दर वाढले होते.
या काळात ग्राहकांना चांगला व ताजा भाजीपाला उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लाँकडाऊन काळात भाजीपाला विक्री सुरू ठेवली होती. या पद्धतीमध्ये घर
बसल्या शेतीमाल मिळू लागल्यामुळे ग्राहक देखील समाधानी झाले. त्यामुळे आता हक्काने आमच्या सोसायटीत या असे अनेक सोसायटीधारक आवर्जुन सांगत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आठवडे बाजारामध्ये भाजीविक्री करत असल्याने काही सोसायटीमधील एक, दोन ग्राहक परिचयाचे होते.

एका सोसायटीमध्ये पाच- सहा ग्राहकांना भाजी देण्यास सुरवात केली. त्या पाच ते सहा ग्राहकांना भाजीपाला दिल्यानंतर हळूहळू ग्राहकांची संख्या वाढत जाऊन एकाच सोसायटीत जवळपास वीस ते पंचवीस ग्राहक त्यांना मिळाले. आता एका सोसायटीमध्ये जवळपास सुमारे शंभराच्या वर ग्राहकांना भाजीविक्री यशस्वीपणे चालूच आहे. अशा प्रकारे आता जवजवळ सहा सोसायट्या आत्तापर्यत जोडल्या गेल्या असून सुमारे सहाशेपेक्षा जास्त ग्राहक थेट भाजीपाला त्यांच्याकडून घेत आहेत.

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना आधार

कोरोनामुळे लाँकडाऊन झाले आणि ग्राहकांना ताजा आणि स्वच्छ भाजी माल मिळत नव्हता. त्याच काळात भाजीपाल्याचा दर ही खूप अधिक होता. परंतु आता सीमाताईंकडे ताजा आणि स्वच्छ भाजीपाला कमी दरात ग्राहकांना मिळाल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. त्यातच शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना अनेक शेतकऱ्यांनी जाधव यांच्याकडे शेतमाल घेण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांचा भाजीपाला  खरेदी करून तो ग्राहकांना विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

थेट शेतीमाल विक्रीत आलेल्या विविध अडचणी

थेट शेतमाल विक्री करताना एकाच वेळी अनेक ठिकाणाहून भाजीपाल्याची मागणी येत असल्याने सर्वांना भाजीपाला देणे अशक्य झाले. बऱ्याचदा वेळेच्या मर्यादा देखील आल्या होत्या. बऱ्याचदा शेतकऱ्यांचा माल वेळेत मिळत नसल्याने ग्राहकांना वेळेत पोहचू शकला नाही. त्यासोबत लाँकडाऊनच्या काळात पोलिसांकडून अडवणूक करण्यात येत होती.

लाँकडाऊन काळात टेम्पोमध्ये दोघांनाच प्रवास करण्याची परवानगी होती अशा अडचणी आल्या होत्या. त्यांना भाजीपाला विक्रीचे काम खूप होते कारण एकाएका सोसायटीमध्ये १००-१२५ ग्राहकांकडून भाजीची मागणी येत होती. खूप वेळा सोसायटीमधील कमिटी मेंबर्सची मदत घेऊन येणाऱ्या अडचणीवर मात केली. भाजीपाला विक्री करताना वेळेचे नियोजन चांगले केल्याने फायदा झाला.

शेतीत नवनवीन प्रयोग करताना अनेक संकटावर मात त्यांनी केली म्हणून विविध माध्यमांनी त्यांची दखल घेतली. महिला शेती पुरस्कार ( ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंन्ट ट्रस्ट, बारामती), उत्कृष्ठ महिला शेतकरी पुरस्कार (महाराष्ट्र सिंचन सहयोग), वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद), उद्योगजननी कमल पुरस्कार (सेंद्रीय शेती), कृषीथाँन पुरस्कार, अभिनव कृषी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले.

सौ.सीमा चंद्रकांत जाधव
मु.पो. चिंबळी, ता. खेड, जि.पुणे.
मोबाईल – 9011659281

ग्लोबल न्युज नेटवर्क: