केंद्राच्या मदतीनेच परमबीर सिंह देशाच्या बाहेर पळाले – संजय राऊत

 

ईडीने काल रात्री उशीरा तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा झटका लागला आहे.त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली असून हा महाविकास आघाडीला दुसरा झटका मानला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांनी अटक दुर्दैवी आहे. ही अटक कायद्याला आणि नितीमत्तेला धरुन नाहीये. देशमुखांवर आरोप करणारे लोक आरोप करुन पळून गेले नाहीत तर त्यांना पळवून लावलेलं आहे. कुणीही देशाबाहेर जो पळून जातो तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. एकप्रकारे नाव न घेता त्यांनी मोदींवरच निशाणा साधला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेंव्हा हा देश सोडून जातो तेंव्हा तो केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय पळून जाऊ शकत नाही. त्याने केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय यंत्रणा अटक करतेय. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत अटक करणं चुकीचं आहे. त्रास देण्याचा हा प्रकार मुद्दाम केला जातोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: