अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, रत्नागिरी आणि चंद्रपुरातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचा जोर कायम असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाने (IMD) बुधवार (26 जुलै) ते गुरुवार दुपारपर्यंत मुंबई (Mumbai) आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सर्व शाळा – महाविद्यालयांना गुरुवारी (27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरीतही शाळांना सुट्टी

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना गुरुवार, 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात यापूर्वी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने व अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जुलै 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळै कोणत्याही प्रकारची अनुसुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2)(5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये व महाविद्यालये यांना 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

पुढचे 48 तास महत्त्वाचे, पुणे हवामान खात्याचा अंदाज

– कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट,

– या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता,

– मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

– पुणे हवामान खात्याचा अंदाज

ग्लोबल न्युज नेटवर्क: