अन जय्यत तयारी सुरू असतांनाच नवरदेवाने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला ; वाचा सविस्तर-

अन जय्यत तयारी सुरू असतांनाच नवरदेवाने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला ; वाचा सविस्तर-

परवा एका जवळच्या मित्राच्या साखरपुड्याला गेले, सगळी तयारी अगदी जय्यत सुरू होती. तेवढ्यात मुलीच्या आईने येऊन साखरपुडा होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि काहीही आगाऊ चर्चा न करता पण कुजबुजत शंभरेक माणसांची गर्दी पांगली. मित्राला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा समजलं की, होणारी बायको सतत त्याच्या सोशल मीडियावर बारीक नजर ठेवून असायची.

त्यात सुरुवातीला त्याला ते इतकं गंभीर वाटलं नाही पण मग हळूहळू त्याच्या इन्स्टाग्राम, फेसबुकवरून एखाद्या मैत्रिणीच्या फोटोला तसेच रीलच्या गाण्यांना त्यानें दिलेले लाईक होणाऱ्या बायकोमार्फत मोजले जाऊ लागले. अमुक एखाद्या मुलीच्या पोस्टवर जाऊच नको, तमुक एखाद्या मैत्रिणीची कमेंट मला पटलीच नाही म्हणून तिला ब्लॉक कर असे सल्ले ही येऊ लागले. हळूहळू ते प्रकरण मित्राच्या सोशल मीडियाचा पासवर्ड मागेपर्यंत पुढे गेलं.

खरंतर मित्राला पासवर्ड द्यायलाही काही समस्या नव्हती पण मित्र कमालीचा वैतागला होता ते सोशल मीडियावरून ती गृहीत धरून असलेल्या त्याच्या भ्रमिष्ट इमेजला! इन्स्टाग्रामवर एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या फोटोला “तू खूप क्युट दिसतेस” अशी मित्राने दिलेली कमेंट बघून त्याला बदफैली ठरवू पाहणारी मुलगी, आपल्याला संपूर्ण आयुष्यभर किती छळेल याची पुरेपूर कल्पना आल्यामुळे मित्राने साखरपुडा मोडला होता.

सोशल मीडिया हे आज संपर्काचे आणि आपले विचार व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम आहे पण काही लोक त्यालाच माणसाचे वैयक्तिक आयुष्य समजून आरोप प्रत्यारोप करतात, त्यामुळे सगळ्यात मोठी हानी वैयक्तिक नातेसंबंधांची होते.

आजच्या जगात मेसेंजर, वॉट्सअप, फेसबुक इ. गोष्टीचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर एक भयंकर मोठा पगडा आहे. त्यामुळे या मोबाईल किंवा तंत्रज्ञानाच्या बाहेर श्वास घेणारी जिवंत माणसंही इथेच आहेत, या गोष्टीचा आपल्याला विसर पडतोय. या तांत्रिक विश्वाच्या बाहेर माणसाचं एक संवेदनशील, सहृदयी मन आहे आणि त्या मनात अतिशय शुद्ध, पवित्र आणि निस्वार्थ भावना निवास करतात, या गोष्टींवरून जणू आपला विश्वासच उडालेला दिसतोय.

काही माणसं तर या सोशल मीडियाला एक दुसरे विश्व समजून स्वतःमध्येच एक दुहेरी आयुष्यही जगतांना दिसतात. त्यांच्या आयुष्यात एक सोशल मीडियावरील जगणं आणि दुसरं वास्तव आयुष्यातील जगणं असा दोन दगडांवरील प्रवास समांतर चालू असतात. त्यामुळे ते दोन्ही ठिकाणी वेगवेगळे नातेसंबंध निर्माण करतात.

आजघडीला सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध सहज निर्माण होतात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार इथे व्यक्त होतो. काहीवेळा नकळत त्यातून वैयक्तिक एकटेपणा अधोरेखित होतो, इथून तुमच्या आर्थिक तसेच सामाजिक स्थितीचा सहज अंदाज लागतो, त्यामुळे तिऱ्हाईत माणसं तुमची फसवणूक करू शकतात तसेच अनेकदा या माध्यमातून माणसाच्या व्यक्तित्वाची खोटी अभिव्यक्ती ही प्रसारित केली जाते.

त्यामुळेच सायबर क्राईमच्या अनेक घटना घडायला सोशल मीडिया कारणीभूत ठरतोय. त्यामुळे काही लोकांना सोशल मीडियावरील तुमच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीही फसवणूक करणाऱ्यां वाटू शकतात, यात अनेकदा दोष आसपासच्या वातावरणाचा असतो पण काही चांगली माणसंही त्यात भरडली जातात आणि कोणतेही खास कारण नसतांना ते अविश्वासाचा विषय होतात.

मूळात ज्यांच्या मनात हा अविश्वास निर्माण होतो तेही अनेकदा दुर्दैवीच असतात! कारण त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा, मानसिक कोंडी, भावनिक आधाराची कमतरता, आपल्या म्हणवणाऱ्या माणसाचं दुटप्पी वागणं आणि मनात असणाऱ्या नकारात्मक संवेदना इ.गोष्टी कायम मोबाईल नामक निर्जीव माध्यमातून प्रवाही होत असतात. त्यामुळे अशा या भ्रमिष्ट दुनियेत अडकलेल्या माणसांसाठी या तांत्रिक गोष्टीतून निर्माण होणारी तुमची एक अदृश्य छबी म्हणजेच तुम्ही असता.

मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या साधनांच्या बाहेरही समोरील माणसाचं एक वेगळं असं स्वतंत्र आयुष्य आहे…ह्या सगळ्या गोष्टींचा अशा लोकांना गंधही नसतो त्यामुळे ते या भासमय दूनियेतच रममाण होतात. त्यांच्या लेखी एखाद्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये दिसणारा जमा डेटा म्हणजेच समोरच्या व्यक्तीचं वास्तव आयुष्य होय!

उच्च सुशिक्षित, सुखवस्तू आणि सुसंस्कृत असूनही हे लोक त्यांच्या याच विचारसरणीला प्रमाण मानून जगतात आणि त्यांना जे वाटतं तेच सगळ्या विश्वासाठी बरोबर आहे असंही त्याचं कट्टर मत होत असतं…..! त्यातूनच एखाद्याचे मोबाइल चाळणे, चॅट वाचणे, सोशल प्रोफाईल वर नजर ठेवणे अशा गोष्टी त्यांच्यामार्फत घडत जातात. खरं तर इथे ही माणसं वाईट नसतात पण त्यांना जडलेली ही व्याधी फार वाईट असते. आजच्या डिप्रेशनग्रस्त तरुणाईत ही व्याधी मोठ्या प्रमाणात फोफावते आहे. ज्याचा त्रास सरळ साधं आयुष्य जगू पाहणाऱ्या एखाद्या निरागस मनाला होतो. बऱ्याचदा एखादी व्याधी शरीरात विष पसरविण्यास कारक ठरते म्हणून डॉक्टरांना अपरिहार्यपणे शरीराचा तो भाग कापून टाकावा लागतो त्याचप्रमाणे कधी कधी आपल्या आयुष्यातील अशी व्याधीग्रस्त जवळची माणसंही आपल्याला कायमस्वरूपी तोडावी लागतात.

एखादं दूरचं नुकसान टाळण्यासाठी वर्तमानात जोखीम उचलावी लागली तर त्यात गैर काहीच नाही! असा विचार करत आपण हे संबंध नाकारतो. ते योग्यवेळी नाकारणे चांगलेच आहे पण प्रत्येकवेळी एखादीच बाजू अशी भ्रमिष्ट असेल असे नव्हे, तर काही वेळा दोन्ही बाजूला ही भ्रमिष्टता सारखीच पसरलेली असते. तेव्हा मात्र नात्यांमधील तणाव पराकोटीचे वाढतात. ज्याचे अत्यंत वाईट परिणाम आजच्या समाजात ब्रेकअपपासून ते घटस्फोटापर्यंत ताणलेले दिसून येतील. हे टाळण्यासाठी प्रत्येक नात्यात विश्वासाची एक अढळ चौकट निर्माण होणे फार गरजेचे आहे.

©️ ज्योती हनुमंत भारती.

पूर्वप्रसिद्धी:
दैनिक संचार (इंद्रधनु)
दिनांक: १९ जून, २०२१.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: