७/१२ म्हणजे काय ? कशा वाचाव्या सातबारावरील नोंदी

७/१२ म्हणजे काय ? कशा वाचाव्या सातबारावरील नोंदी

ग्लोबल न्यूज : कामानिमित्त शहरामध्ये अथवा इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या आजच्या  पिढीला सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असल्याचं दिसत नाही. अनेकवेळा जमिनीची खरेदी विक्री करताना फसगत होण्याची शक्यता राहते. त्यामुळेच ‘शेतकरी टाइम्स’ आजपासून आपल्यासाठी शेतीशी संबंधित असणारे दस्तावेज आणि कायद्यांची माहिती देणारी लेख मालिका सुरु करत आहेत.

आज आपण शेतीचा आरसा समजल्या जाणाऱ्या अत्यंत महत्वाचा दस्तावेजाबद्दल माहिती घेणार आहोत. शेतीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला ७/१२ सातबारा म्हणजे काय हे ठाऊक असते. परंतु अनेकवेळा तो वाचायचा कसा हे लक्षात येत नाही. महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी रजिस्टर बुक्स असतात, यामध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.  ही माहिती नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते.  त्यातील 7 नंबरचा नमुना हा मालकीहक्काबद्दलचा तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हीं कलमांना मिळून 7/12 ( सातबारा) म्हंटले जाते. गावातील तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

७ / १२ वरील नोंदी

१ ) ऊतार्‍याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो.सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नं. दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नं किंवा गट नं म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नं मध्ये दाखविलेले असते.त्याजवळच जमिन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमिन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते.

२ ) भूमापन क्रं.चे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्‍याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास(खाचर/वाळूखाच) उल्लेख असतो.

३ ) लागवडीचे योग्य क्षेत्र यात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते.

४ )  पो.ख. म्हणजे ‘पोट खराबा’ म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते.

५) ‘आकार’जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो.

६ ) गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते.प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमिन विकत देणार्‍याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.जमिन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नविन मालकाचे नाव त्याखाली लिहीले जाते.

७ ) उताऱ्याच्या उजव्या बाजूला खाते क्रमांक दर्शवलेला असतो तसेच कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते.

८ ) इतर हक्क मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणार्‍याच्या नावाची नोंद असते.या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते.इतर हक्क सदरात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे गरजेचं आहे.

९ ) मालकाचे नावाशेजारी,वर्तुळात काही क्रमांक दिलेले असतात त्याला फेरफार असे म्हणतात. सातबाऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक नोंदीसाठी फेरफार क्रमांक नोंदवला जातो.

१० ) कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमिन जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही. असा शेरा असलेली जमिन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती शेतकरी असणे गरजेच आहे संबंधित व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकार्‍याकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: