मोदी हे नटसम्राट, त्यांचे अश्रू मगरीचे; प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले आक्रमक

ग्लोबल न्यूज: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन पटोले यांनी आज मोदींवर जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेतील अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, हे देशातील जनतेला माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

मोदी हे नटसम्राट आहेत. राज्यसभेत भावूक झाल्याचं दाखवत होते. मात्र, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावेळी ते भावूक झाले नव्हते, अशा शब्दात पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी यांना आता नटसम्राटाची पदवी द्यायला हवी, अशी टिप्पणी त्यांनी केली. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे, प्रेस क्लब तर्फे आज नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आले. वार्तालाप कार्यक्रमात पटोले बोलत होते.

देशात अंबानी आणि अदानीच गरीब

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदा लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर माथा टेकला होता. आपण देशातील गरीब जनतेसाठी काम करणार असल्याचं त्यावेळी मोदींनी सांगितलं होतं. पण आता देशात अदानी आणि अंबानी हेच गरीब असल्याचं वाटत आहे, असा टोलाही पटोले यांनी मोदींना लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांचे राज्यसभेतील अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, ते देशातील जनतेला माहिती आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.

टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का? असा सवालही नाना पटोले यांनी केला. राज्यसभेत मोदींनी अश्रू ढाळले असले तरी राकेश टिकैत यांचे अश्रू सर्वसामान्य जनतेच्या लक्षात राहील, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

कमळ चिंबले

भाजपच्या ऑपरेशन लोटस बाबत पटोले यांना विचारले असता भाजपचे कमळ चिंबले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. राज्यपालांनी राज्यसरकारतर्फे शिफारस करण्यात आलेल्या 12 आमदारांच्या पत्राबाबत काहीच केले नाही याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की यासंदर्भात आघाडी सरकार न्यायालयात दाद मागणार आहे. यापूर्वीही 1984 ते 1988 या कालखंडात विधानपरिषदेत राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नेमणूका झाल्या नव्हत्या याकडे लक्ष वेधले असता त्यावेळी मंत्रिमंडळानेच शिफारस केली नसावी, असा खूलासा त्यांनी केला.

कुठलेही गट-तट नाहीत

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आणि सूट आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे म्हणता तशी भाजपमध्येही आहे. पण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं की कुठलेही गट-तट नाहीत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला विजय मिळाला, असा दावाही पटोले यांनी केला. काँग्रेसचे मंत्री चांगलं काम करत आहेत. मी स्वत: मंत्र्यांचा आढावा घेईल, असं पटोले यांनी सांगितलं.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: