“वरण भात “-देवाचं मानव जातील दिलेलं वरदान ..!

“वरण भात “-देवाचं मानव जातील दिलेलं वरदान ..!

आयुष्यात काही पदार्थ आपण कधीच रिप्लेस करू शकत नाही ,अर्थात त्यांची रिप्लेसमेंट मिळत देखील नाही .
त्यांची जागा हि ध्रुव ताऱ्या सारखी असते .
तुम्ही कितीही जिभेचे चोचले पुरवा ,पण जेवणाची पूर्तता फक्त तुम्हाला हेच पदार्थ देऊ शकतात .

जेवणाच्या पानातील एक अढळ स्थान घेतलेली हि मंडळी ,ताटात नसलीकी काहीतरी चुकल्या सारख वाटतं .
सागर मंथनातून म्हणे अनेक अमूल्य ठेवी निघाल्या ,मला वाटतं ह्या पदार्थाच्या रेसिपी देखील ,देवलोकात बसणाऱ्या महिला मंडळाने तयार केल्या असाव्यात ,म्हणूनच बालगोपाळांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत ज्या एका पदार्थाने सर्वांच आयुष्य व्यापल आहे तो म्हणजे
“वरण भात “…!

आता हा कोणत्या प्रांतातून आला ,किव्वा ह्याचा इतिहास काय ,हे सगळं जाणून घेण्यात कोणत्याही खवैयाला रस नसतो ,त्याच काम फक्त ,बोटांची जुळवा जुळव करून हे अमृततुल्य खाद्य मुखाद्वारे आपल्या यज्ञकुंडात ढकलायच आणि एक तृप्तीचा ढेकर देऊन ,बनवणाऱ्याच तोंड भरून कौतुक करायचं .

आपल्या आयुष्यात नेमका याने केव्हा प्रवेश केला हे कुणीही सांगू शकणार नाही .

लहानपणी दात नसतांना चावता येत नाही म्हणून ,एकमेव खाण्याजोग काही असेल तर तो “भात”..!
मऊ लुसलुशीत भातावर थोडंसं वरण टाकून ,सगळ्याच आयांनी आपल्या लाडक्या कार्ट्याला किव्वा कार्टीला भरवलेला हा भात आपल्या बालपणाची साक्ष देतो .
आयुष्याच्या सुरवातीपासून ते अगदी अंत काळापर्यंत हा आपली साथ कधीही सोडत नाही , अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना सुद्द्धा हा तितकच सुख देतो .

देवाच्या नैवेद्याच्या ताटापासून ते नवीन वास्तूच्या पूजनात पिशाच्याला देण्यात येणाऱ्या घासामध्ये ,भाताचं अस्तित्व हे अभाधित आहे . गरिबा पासून ते श्रीमंता पर्यंत सगळ्यांच्या पोटात प्रवास करणारा असा हा एक अवलिया आहे .
“गरिबाला परवडणारा आणि श्रीमंताला आवडणारा “..!
ऐन वेळेला जेवायला काय करायचं ? ह्या गृहिणीच्या त्रासदायक प्रश्नाचं उत्तर आहे “वरण भात “. !

कधी शेजवान राईस ,कधी मन्चुरिअन राईस ,अशी नानाविधं
रूपे घेऊन तरुणांच्या मनात आपल एक वेगळच स्थान निर्माण करणारा आहे हा “भात “..!

लग्नात ,किव्वा व्याही भोजनात ,ज्याच्यावर “अहो घ्या हो ”
असं म्हणून तुपाची धार सोडली जाते तोच हा “भात “..!
अगदी तान्हुल्याच्या पहिल्या वाढदिवसापासून ते म्हाताऱ्याच्या श्राद्धापर्यंत ,सगळ्या पंगतीत जेवणाची सुरवात
आणि शेवट जो करतो ,तोच हा “भात “..!

कुठल्याही थाळीची मग ती ,महाराष्ट्रीयन असो ,गुजराती असो ,इटालियन असो ,कि जॅपनीज असो ,अनेक शैलींमध्ये याची हजेरी लागते आणि ह्याची हजेरीच खैवयांना जेवणाचा खरा आनंद मिळवून देते .

भातापासून अनेक प्रकार बनत असले ,तरीही साध्या वरण
भाताची मजा काही औरच.स्त्री ने कितीही मेक उप केला ,पण , पदर खांद्यावर घेऊन कपाळावरती लावलेल्या टिकलीवरच्या कुंकवाचा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जी काही भर टाकतो ,तेच काम हा वरण भात जेवणाची चव आणि शोभा वाढवण्याच करतो .

शेवटी कतरीना कितीही कंबर वाकडी करून नाचली,पण मधुबालाची निरागसता तिच्यात किंचितही दिसणार नाही.
असा हा वरण भात ,पारंपरिक पण नव्याशी जुळवून
घेणारा , गरीबाच पोट भरणारा ,श्रीमंतांचे चोचले पुरवणारा
मागच्या काही वर्षात मात्र ,तथाकथित काही बिनडोक आणि अर्धवट लोकांच्या मानसिकतेमुळे बदनाम झाला आहे .
जेवणाच्या पानातील त्याचा मान कमी झाला आहे .
डाएट प्लॅन च्या नावाखाली ,त्याला आहारातून वगळण्यात
आलं आहे .

काय तर म्हणे “भात खाल्याने पोट वाढत”.. ,तूप खाल्याने कोलेस्ट्रॉल वाढत,अश्या वेडगळ कल्पना समाजात जाणून बुजून पेरल्या गेल्या .शेवटी काही झालं तरी भाताचं माहात्म्य हे खवैयांच्या मनातून कुणीही पुसू शकत नाही .भातावर वरण वाढल्यावर जस ते संपूर्ण जेवणाचं पान व्यापून ,आजू बाजूच्या चटणी आणि कोशिंबिरीत मिसळून जात ,तसंच आपलं आयुष्य ह्या इंद्रलोकातल्या जादुई पदार्थाने व्यापल आहे .

असा हा सर्वांनाच भावणारा ,गृहिणीच्या पसंतीस उतरणारा ,हॉस्टेल वर राहणाऱ्या मित्रांची भूक भागवणारा ,पाककलेतील कोणतेही विशेष कौशल्य नं वापरता पटकन तयार होणारा आणि कुकर ला घरातील लडिवाळ स्त्रियेला शिट्टी मारायला भाग पाडणारा ,ह्याचे कितीही गूण गायले तरी मराठी साहित्यातील सगळे यमक ,प्रास ,क्रियापद कमी पडतील .

तर लोकहो ,अश्या ह्या देवाच्या नैवेद्याच्या ताटात सर्वोच मान असणारा भात तुम्ही कधी शिकता आहात करायला ?

सर्व भात प्रेमींना समर्पित ….! ❤️

अक्षय मुळे
नाशिक

ग्लोबल न्युज नेटवर्क: