लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होतायत? हा करा घरगुती उपाय

 

मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात अर्ध्याहून अधिक लोकांचा वेळ स्क्रीनवर जातो. त्यामुळे डोळे दुखणे, डोळे कोरडे होणे (Dry Eyes), जड होणे, थकवा येणे, तीव्र वेदना होणे, डोळ्यांत जळजळ होणे अशा समस्या जाणवू लागतात.अनेक वेळा हा त्रास इतका वाढतो की, डोळ्यांची उघडझाप करणं कठीण होऊन जातं. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

मात्र त्याचबरोबर काही घरगुती उपायांनीसुद्धा तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो. ज्यावेळी आपल्या अश्रू ग्रंथी डोळ्यांना पुरेसा ओलावा तयार करण्यासाठी अश्रू तयार करू शकत नाहीत, तेव्हा डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो. अशा परिस्थितीत डोळ्यांतील घाण साफ होत नाही, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना आणि जडपणा येतो. त्यामुळे डोळे पुरेसे हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. डोळ्यांना आराम देण्याचे काही सोपे उपाय आहेत ते जाणून घ्या.

शरीराला हायड्रेट ठेवा : पुरेसा ओलावा न मिळणे हे डोळ्यांच्या कोरडेपणामागचं एक कारण असू शकतं. त्यामुळे या काळात तुम्ही भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही दिवसातून 10 ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. याशिवाय डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी डोळ्यांना ओलावा मिळेल असे काही पदार्थ खा.

डोळ्यांना गरम पाण्याचा शेक द्या : डोळ्यांना पुरेशा प्रमाणात हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, तेल हे घटक आवश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा सुरू होतो. हॉट वॉटर कॉम्प्रेसमुळे या समस्येत लवकर आराम मिळू शकतो. यासाठी कोमट पाण्यात सुती कापड भिजवा आणि डोळ्यांना शेक द्या. असे केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल.

पापण्यांचा व्यायाम करा : बराच वेळ स्क्रीन टायमिंग डोळ्यांच्या कोरडेपणाचं मुख्य कारण आहे. कामामुळे स्क्रीनच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर पापण्यांचा व्यायाम करा. यासाठी दर 20 मिनिटांनी पापण्यांची 20 सेकंदांसाठी हळूहळू उघडझाप करा. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या ग्रंथी शिथिल होतील.

मसाज करा : वेदना कमी करण्यासाठी तुमच्या बोटांनी तुमच्या डोळ्यांना हलक्या हाताने मसाज करा. तज्ज्ञांच्या मते डोळ्यांच्या दुखण्यावर हलक्या हाताने हलका मसाज करणं खूप प्रभावी आहे. त्याच्या मदतीने, रक्ताभिसरणाबरोबर, स्नायूंना आराम देखील मिळतो.

डोळे थंड पाण्यानं धुवा : थंड पाण्यानंही डोळ्यांना खूप आराम मिळतो. लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळे थकतात. अशा वेळी डोळ्यांवर थंड पाण्यानं धुवा, यातून तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळेल.

Team Global News Marathi: