कोल्हापुरातील गर्भलिंग निदानप्रकरणाची दोन डॉक्टरांसह चौघांना अटक

 

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून भुदरगड पोलिसांनी रविवारी आणखी एका एजंटला अटल केली, तर राधानगरी पोलिसांनी नव्याने दोन डॉक्टरसह एका एजंटला अटक केली. गेल्या चार दिवसांत या गुन्ह्यात एकूण १२ संशयितांना अटक झाली असून, त्यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे. रॅकेटमधील डॉक्टरांनी एजंटगिरीसह गर्भपाताचे काम केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राधानगरी आणि भुदरगड पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या चार दिवसांत भुदरगड पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली, तर राधानगरी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली.

भुदरगड पोलिसांनी रविवारी सकाळी अमोल सुरेंद्र सुर्वे (वय ४२, रा. रूई, ता. हातकणंगले) या एजंटला अटक केली. राधानगरी पोलिसांनी नव्याने दयानंद पांडुरंग संकपाळ (वय ३४, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), डॉ. ज्ञानदेव लक्ष्मण दळवी (वय ५२, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) आणि डॉ. उमेश लक्ष्मण पवार (वय ४७, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी) या तिघांना अटक केली. अटकेतील सर्व संशयितांना २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Team Global News Marathi: