मागेल त्याला लस द्या, मंत्री अशोक चव्हाण यांची मागणी !

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. मात्र राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात केंद्राकडून काही नियम आखण्यात आले आहे. यावरच आता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

महाराष्ट्रासारख्या करोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना लस’ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी प्रत्येक नागरिकाला लस देण्याची केलेली मागणी योग्य असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

“राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असून, केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या करोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे.

करोनाच्या नव्या लाटेत तरूणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा ४५ वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे,” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: