उद्धव ठाकरेंकडून 1.5 वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बीकेसीवरील मेळाव्यातून सडेतोड उत्तर दिलं. ‘बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केली. या टीकेवरुन आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात असून आता मनसेनंही या टिकेवरुन उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची आठवण करुन दिली.

उद्धव ठाकरेंनी शिंदे कुटुंबीयांवर व्यक्तीगत टिका करताना त्यांच्या घरातील १.५ वर्षांच्या चिमुकल्याचाही उल्लेख केला. त्यावर एकनाथ शिंदेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. “तुम्ही माझ्या दीड वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात. तुम्हाला सांगतो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हाच तुमचे अध:पतन सुरू झाले” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. एक दुखावलेला बाप… म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता, मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरुन त्यांना लक्ष्य केले, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण करुन दिली.

 

खोके, गद्दार, खंजीर, सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या “बाळाचा” केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना पण आवडला नसता, असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी दीड वर्षांच्या बाळावर केलेल्या टिकेवरुन आता राजकारण रंगलं असताना, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ती टीका व्यक्तीगत हेतूने नव्हती. तर, राजकीय विरोधातून होती, अशी सारवासारव दानवे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: