राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट

 

मुंबई | भाजपा नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईत चांगलाच राडा घातला. नगरसेवक अमेय घोले यांनी थेट बॅनर लावून नारायण राणे यांना कोंबडी चोर म्हंटल्यानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली.

यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. यावेळी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना या लाठीचार्जमध्ये सौम्य दुखापत झाल्याचे समोर आले होते. मात्र मुंबईतील वातावरण चांगलेच तापू लागले होते.

दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.

Team Global News Marathi: