दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचा त्रास होतो? त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका!

दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचा त्रास होतो?
त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका!
– व.पु.काळे

कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तर एकेक अकाऊंट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा.

आपण जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही. आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात, असे नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली. तो अकाउंट संपला. ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा.

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत. हीसुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून- मला का जगवलंस? हा प्रश्न विचारू नका. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तर एकेक अकाऊंट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा.

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाऊंट क्लोज्ड असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाऊंट्स क्लोज्ड झाले, याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं, तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो. आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून मुक्त केले आहे.

हा प्रयोग करून बघा आणि किती खाती फटाफट बंद होतात, याची प्रचिती घ्या. मीसुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा.

*मग कोणी कितीही त्रास दिला, तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.*
– व पु काळे

ग्लोबल न्युज नेटवर्क: