आज बाळासाहेब असते तर..’, क्रांती रेडकरचे उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र,

 

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगले शीतयुद्ध पेटलेले पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला फोटो, त्यांचा जन्माचा दाखला, निकाहनामा असं सारं ट्विट केलं होत. तर या ट्विटला समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले होते.

 

याच पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली आहे. क्रांतीने काय म्हटलं आहे पत्रात? क्रांतीने तिच्या कुटुंबीयांना होणारा त्रास या पत्रात नमूद केला आहे. तिने असं म्हटलं आहे की- ‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.

तसेच त्या पुढे लिहितात की, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले… कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायंत. ‘मी एक कलाकार आहे. राजनीती मला कळत नाही. आणि मला यात पडायचंसुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.’

 

बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत क्रांती या पत्रात म्हणाली आहे की, ‘आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं… एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरुप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे… आज ते नाही पण तुम्ही आहात… त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो… तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे… तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे… म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय… तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती. आपली बहिण, क्रांती रेडकर.’

Team Global News Marathi: