फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचं हेच तर मिशन

 

मुंबई : आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टोकदार शब्दात फैरी झाडण्यात आल्या आहेत. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होतं, या शब्दात आजच्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुनही सामना अग्रलेखातून भाजपला चिमटा काढण्यात आला आहे. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जातेय, शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदानं नाचतोय, असं म्हणत अग्रलेखातून भाजपवर थेट आरोप करण्यात आले आहेत.

“मराठी माणूस आपसात लढवला जात आहे . कमळाबाईचे हेच तर मिशन होते . ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? पण हे राज्य शिवरायांचे आहे . येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले , ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा. बाकी सारे शिवतीर्थावरच.”, असं म्हणत दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या सर्व शंकाकुशंका बाजूला सारत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा विश्वासही सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात सुरेश भटांच्या गझलेमधील दोन कडवीही देण्यात आली आहेत. ‘जे अघटित घडले त्याचा मज अर्थ कळावा पैसा? पंसाच्या ओठांवरती कृष्णाचा पावा पैसा? हे वीर न शिवरायांचे, जे शरण भराभर गेले! ही झुंज फंदफितुरीची! हा गनिमी कावा पैसा?’ सुरेश भटांच्या गझलेतील कडव्यांचा आधार घेत भाजपवर अग्रलेखातून टीकेची तोफ डागली आहे. “सुरेश भटांच्या गझलेतील वरील दोन कडवी आजच्या राजकीय परिस्थितीत तंतोतंत लागू होतात. ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे.”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: