१२ नावांची यादी अखेर रद्द; राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला यादी परत पाठविली

 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठविलेली १२ नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.राजभवनातून शनिवारी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठविली. ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची १२ जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासूनसुरू होणार आहे. यापूर्वी या १२ जागा भाजप-शिंदे यांच्याकडून भरल्या जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतिपद सध्या रिक्त आहे. आधीचे सभापती रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) यांच्या जागी भाजपला सभापतिपद हवे आहे. संख्याबळ लक्षात घेता ते शक्य नाही.

मात्र, १२ जागा भाजपला मिळाल्यानंतर पक्षाचे विधान परिषदेत २४ आमदार असून, दोघांचा भाजपला पाठिंबा आहे. ७८ सदस्यांच्या सभागृहात सभापती निवडून आणण्यासाठी हे पुरेसे नाही; पण आणखी १२ (शिंदे गटासह) आमदार राज्यपालनियुक्त झाल्यास भाजपचे संख्याबळ ३८ होईल व सभापतिपद घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेनेचे १२, काँग्रेसचे १० आणि राष्ट्रवादीचेही १० आमदार आहेत. तिघे एकत्र आले तरी भाजपलाच सभापतिपद मिळेल.

Team Global News Marathi: