महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटात बॉलीवूडकरांकडून साधं ट्विटही नाही; मनसेचा निशाणा

 

सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी सिने कलाकार मदतीसाठी सरसावलेले असताना दुसरीकडे मुंबईच्या जीवावर मोठे झालेले बॉलीवूड कलाकारांनी आडे ट्विटही केले नव्हते.

याच पार्श्वभूमीवर मनसेने कडक इशारा दिला होता. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं, असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलंय.

इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत. अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्‍यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

 

Team Global News Marathi: