तळकोकणात मुसळधार पाऊस, नद्यांना पूरस्थिती निर्माण

तळकोकणात मुसळधार पाऊस, नद्यांना पूरस्थिती निर्माण

ग्लोबल न्यूज टीम : तळकोकणात मागील काही दिवसांपासून पावसाची सतत धार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्यातील नद्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणील भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे 100 टक्के भरले आहेत. तर 1 मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज ओव्हरफ्लो झाले.

पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. काही मार्गांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेती, बागायतींमधून वाहत आहे.

सिंधुदुर्गात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कसाल येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले.

या संपुर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गापासुन अवघ्या काही अंतरावरून पुराचे पाणी वाहत आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. ओरोस येथील खिश्‍च्रनवाडी पुल, पणदुर-आवळेगाव मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा सपंर्क तुटला. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुल देखील पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून येथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे.

कोरोनसोबत आता पुराचे संकट
सिंधुदुर्गात २ जुलै पासून लॉकडाऊन ८ जुलै पर्यंत असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत.त्यातच गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाःकार माजवला आहे.अनेक ठिकाणी पूर आल्याने शेतीला फटका बसत आहे.काही ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेली आहे.सिंधुदुर्गातील सखल भागामध्ये पाणी साचले आहे.सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात
कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती लागवट केली जाते.लॉकडाऊनमुळे प्रत्येक गावामध्ये चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे भातशेती लागवट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या भात लावणीची कामे केली जात आहे.जोरदार पाऊस होत असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडथळा होत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

महामार्ग बनला धोकादायक
सिंधुदुर्गात मुसळधार होत असल्याने मुबंई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर दिसत आहे.खचलेल्या भागामध्ये पाणी साचत आहे.तसेच अपूर्ण काम काही ठिकाणी रस्त्याचे असल्याने त्याचा फ़टका नागरिकांना बसत आहे.छोट्या मोरी,नाल्याची कामे अर्धवट राहिल्याने अनेक ठिकाणी शेतीत माती वाहून शेतकऱ्यांचे वागदे,ओसरगाव,कुडाळ बाबर्डे व अन्य गावामध्ये मोठे नुकसान झाले आहे.सध्या महामार्गावर दुतर्फा पाणी साचत असल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

कणकवलीत सर्वाधिक पाऊस

गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक १३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ९४.०७५ मि.मी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण १६९४.९०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ९५ (१६०१), सावंतवाडी – ८७ (१७८२), वेंगुर्ला – ६९.६० (१७४२.२०), कुडाळ – १२० (१५७३), मालवण – १०४ (२१७८), कणकवली – १३३ (१६१५), देवगड – ८५ (१५२१), वैभववाडी – ५९ (१५४७) असा पाऊस झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: