शरद पवार यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, सायबर पोलीस स्थानकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दाखल केली तक्रार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला आहे. तसेच त्यांची प्रकृती उत्तर आहे अशी माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाचे आणि हीन लिखाण अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आले. याविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झालेली असून लिखाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिलेली आहे

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर, कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी शेख यांनी दिला

ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की,

आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब सध्या आजारी आहेत.त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.आदरणीय साहेब तिथे उपचार घेत असून,सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत.जी आमच्यासाठी तसेच आदरणीय साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

आदरणीय साहेबांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सुर बाहेर पडले.समाजातील असा कोणताही घटक नसेल,ज्यातून साहेबांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत.मला जसा अनुभव आला तसाच अनुभव आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांना देखील आला.
परंतु हे काळजीचे जसे फोन येत होते,मेसेजेस येत होते,त्याच्या विरोधात अनेक विकृत मंडळी आदरणीय साहेबांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हिन दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत होती.काहींनी तर साहेबांच्या मरणाच्या आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.

या पोस्ट्स पाहून आदरणीय साहेबांना मानणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला.भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार करत,गेली 50 वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान,स्वाभिमान असणाऱ्या साहेबांच्यावर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती.

परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडविण्याचे ठरवले आहे.आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही मुंबई येथे आदरणीय साहेबांच्या विरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात सायबर क्राईम चे एस.पी.श्री. शिंत्रे साहेब यांची भेट घेऊन,कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४,४६९,४९९,५०७,३५, IT act 66(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.

आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो,आहोत.पण यापुढे मात्र आदरणीय साहेबांच्या वर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,हे निक्षून सांगतो आहोत.

Team Global News Marathi: