मंदिर परिसरातील मुसलमानांची दुकाने बंद करणे मूर्खपणा

 

कर्नाटक | मंदिर परिसरांमध्ये होणाऱ्या उत्सवांवेळी मुसलमान व्यापाऱ्यांवर त्यांची दुकानं बंद ठेवण्याचासाठी दबाव आणला जात आहे. हा प्रकार निव्वळ मूर्खपणा असल्याचं म्हणत भाजपच्याच आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.कर्नाटकमधील उडुपी आणि शिवमोगा या भागातील स्थानिक प्रशासनाकडून मंदिरांच्या उत्सवावेळी मुसलमान व्यापाऱ्यांवर त्यांच्या दुकानांना बंद ठेवण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.

सदर कारवाई विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण वैदिक, बजरंग दल आणि श्रीराम सेना या संघटनांनी केलेल्या बंदीच्या मागणीमुळे करण्यात आली. उडुपी आणि शिवमोगानंतर राज्याच्या इतर भागातही हीच मागणी जोर धरू लागली. मात्र अशा प्रकारची बंदी हा निव्वळ मूर्खपणा असून हा प्रकार चुकीचा आणि असंवैधानिक असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे आमदार ए एच विश्वनाथ आणि विधानसभेचे आमदार अनिल बेनाके यांचं म्हणणं आहे.

तसेच म्हैसूरचे आमदार असलेल्या विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, हा वेडेपणा आहे. कुठलाही धर्म किंवा देव आपल्याला हे शिकवत नाही. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालून हस्तक्षेप करणं अपेक्षित आहे. पण, सरकार या प्रकारावर का गप्प बसलं आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार अतिशय खेदजनक आहे. ते नेमक्या काय कारणामुळे मुसलमान विक्रेत्यांवर आणि व्यवसायांना लक्ष्य करत आहेत, ते मला कळत नाही. त्यामुळे सरकारने यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटताना दिसत आहे, असंही विश्वनाथ यावेळी म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: