‘वेदांता’ची मुद्देसूद माहिती सुभाष देसाईंनी दिली, शिंदेंवर खळबळजनक आरोप

 

फॉक्सकॉन आणि वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. ठाकरे गटकडून शिंदे सरकारवर यामुद्द्यावरुन घणाघाती टीका करण्यात येत आहे. फॉक्सकॉन आणि वेदांत हे सेमीकंडक्टर चिप निर्मितीचे प्रकल्प गुजरातला जाण्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

मुळात हे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार होते आणि यासाठी याआधीच्या सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कंपन्यांसोबत बोलणी झाली होती. आता याच प्रकरणाची शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज सविस्तर माहिती दिली आहे.

सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन आणि वेदांता प्रकल्पाची मुद्देमूद माहिती व घटनाक्रम सांगत प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरलं आहे. तसंच त्यांनी एक महत्वाचा खुलासा देखील केला आहे. “फॉक्सकॉन आणि वेदांता हे सेमीकंडक्टर चीप निर्मितीचे प्रकल्प महाराष्ट्राला हवे होते. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते.

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये मी आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा केली होती. अगदी सकारात्मक चर्चा झाली होती. खरंतर त्यावेळी गुजरात स्पर्धेतही नव्हतं. ‘फॉक्सकॉन’, ‘वेदांता’चे प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तेलंगणा स्पर्धेत होते. त्यावेळी गुजरातचं नाव कुठेच नव्हतं. मग आज अचानक गुजरातची निवड कशी झाली हा आश्चर्याचा मुद्दा आहे”, असं सुभाष देसाई म्हणाले. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“देशात आयटी हबसाठी तीनच राज्य प्रामुख्यानं आघाडीवर आहेत. मुंबई-पुण्यातील आयटी हबमुळे महाराष्ट्र, बंगळुरूमुळे कर्नाटक आणि हैदराबादमुळे तेलंगणा राज्य स्पर्धेत होतं. यात गुजरातचा आयटी हबशी काहीही संबंध नाही. दावोसमध्ये आमची वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्याशी सविस्तर बोलणं झालं होतं आणि ते महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याच्याच भूमिकेत होते.

पण आम्हाला केंद्राची परवानगी घ्यावी लागेल असं तेव्हा त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं. त्यामुळे तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आताच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, असं सुभाष देसाई म्हणाले.

Team Global News Marathi: