रस्त्यावर राहणाऱ्या आणि बेघरांच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई मनपाने घेतला पुढाकार !

राज्यात कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्यांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच आता मुंबई मनपाने पुढाकार घेऊन मुंबईमधील बेघर आणि भिकाऱ्यांना अन्नपदार्थ पाकिटांचे वितरण करण्यासाठी सुमारे दोन कोटी २० लाख रुपये खर्च करण्याचा मानस ठरवला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार दर दिवशी दुपार आणि रात्री मिळून २० हजार अन्नपदार्थ पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईत पुन्हा करोनाच्या संसर्गात झपाटयाने वाढ होताना दिसून आली होती. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र कडक निर्बंध लागू होताच पहिल्या शनिवार-रविवारी बेघर आणि भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पालिकेच्या नियोजन आणि संकलन विभागातील कर्मचाऱ्यांकडून ४० रुपये वर्गणी गोळा करण्यात आली होती.

यातील २० रुपये बिस्कीट पुडा, तर २० रुपये केळ्यांसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानंतर पालिका दप्तरी नोंदणी असलेल्या भिकाऱ्यांना अन्नपदार्थाचा पुरवठा करण्यासाठी काही सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले होते. तीन-चार सामाजिक संस्थांनी अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्याची तयारीही दर्शविली होती. त्याचे वाटप करण्याची जबाबदारी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

Team Global News Marathi: