राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भरा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजून याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. आता तरी महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करून राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात श्री. भांडारी यांनी म्हटले आहे की, राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या गुणवंत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. भाजपा आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा केली होती. मात्र ३१ जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.

महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि या जागा भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नये, असेही श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 

Team Global News Marathi: