राज्य सरकारने उत्तीर्ण उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा इशारा

 

राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्यात अक्षम्य विलंब होत असल्याने उमेदवारांना वैफल्य येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अशा पात्र उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने त्यांना नियुक्ती पत्रे द्यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य प्रशासनाच्या सेवेतील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले होते, मात्र ही मुदतही पाळली गेली नसल्याने आघाडी सरकारची असंवेदनशीलता दिसून आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, उत्तीर्ण होऊनही दीड वर्ष नियुक्ती न झाल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. या घटनेतून राज्य सरकारने काहीच धडा घेतल्याचे दिसत नाही. रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘ तारीख पे तारीख ‘ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे. सहायक वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४७ उमेदवारांना अजून नियुक्ती मिळाली नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नियमांवर बोट ठेवून या उमेदवारांची नियुक्ती प्रशासनाने थांबविली आहे. उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्र्यांनाही याबाबत निवेदन देऊन काहीच उपयोग झाला नाही.

राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी केली. तेंव्हा कुठे सरकारने सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या. उपमुख्यमंत्र्यांनी शासनाच्या सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितली होती. मात्र या मुदतीत सर्व विभागांनी माहिती सादर केली नाही. राज्य सरकारला रिक्त पदे भरण्याची इच्छाच नाही हेच या दिरंगाईतून दिसून येत असल्याचे माधव भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे

Team Global News Marathi: