“शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत आघाडी सरकारला देण्यास भाग पाडू” -देवेंद्र फडणवीस

हडोळती  (जि. लातूर) : साहेब चार हजारांची सोयाबीनची बॅग, काढायला पाच हजार लागलेत. त्यात गुढघाभर पाणी सांगा आता आम्ही कस काढायच? पोटाची खळगी भरायच तर दूरच सावकाराची उधारी फेडणार कशी? जास्तीच्या पावसाने सारं मातेर झालयं तुम्हीच आता आमचे मायबाप असून सरसगट नुकसान भरपाई लवकर द्यावी, असा टाहो हडोळतीच्या शानुरबी फकीर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यासमोर मांडला. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत आघाडी सरकारला देण्यास भाग पाडू, असे आश्वासन शेतकऱ्यांना यावेळी दिले.

पावसामुळे झालेल्या नुकसान पहाणीच्या दौऱ्यात हडोळती येथे फडणवीस यांनी पाहणी केली. साहेब तुमच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली होती. बॅंकेच्या खात्यात सतत विविध स्वरूपाची मदत जमा होत होती. या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आता गप्प आहेत.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीची दखल न घेता बॅंकेचे पासबुक ही कोरडे ठेवत फक्त असेच गांजर दाखवत आहे. अशी व्यथा मांडताना अनेक शेतकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला. यावेळी फडणीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत तातडीने नुकसान भरपाईसाठी मदत देण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.

दरम्यान, यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय अधिकारी संजयकुमार कांबळे, प्रवीण फुलारी, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. डी. जाधव, तहसीलदार प्रसाद कुसकर्णी, तालुका कृषी अधिकारी बी. बी. तवर, मंडल अधिकारी मधुकर क्षिरसागर आदी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: