दुकानांची वेळ वाढवा, अन्यथा पालिका निवडणुकीवर बहिष्कार घालू व्यापारी वर्गाचा सरकारला इशारा |

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळा व्यापारी वर्गाला ठरवून दिल्या आहात तर दुसरीकडे मात्र व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असून वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत असूनही राज्य सरकारकडून व्यापारी आणि दुकानदारांवरील निर्बंध हटविले जात नाहीत. चार महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे व्यापार पूर्णपणे डबघाईला आला आहे. आठवड्यातले फक्त पाच दिवस तेही केवळ सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

या अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. चार दिवसांत दिलासादायक निर्णय घेतला नाही तर आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेच निर्बंधांच्या शिथिलीकरणासाठी पाच टप्पे घोषित केले होते. मागील पाच आठवड्यांपासून घसरते आकडे लक्षात घेतले तर मुंबईचा समावेश टप्पा एक किंवा दोनमध्ये व्हायला हवा. तसे झाल्यास दुकानांसह विविध बाबी सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असता. मात्र, कडक लाॅकडाऊनच्या साडेतीन महिन्यानंतर सुद्धा राज्य सरकार कोणत्याही प्रकारची सवलत द्यायला तयार नाही, असा आरोप असोसिएशनचे विरेन शहा यांनी केला आहे.

Team Global News Marathi: