येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप, काँग्रेसने केली ईडी मार्फत चौकशीची मागणी |

 

कर्नाटक | कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून याप्रकरणी सीबीआय, ईडीसह अन्य संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली आहे.

या सरकारी पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १६ कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट करताना सुधींद्र राव यांनी स्वत: सौदा कसा झाला, त्यासाठी काय काय करावे लागले, हे सविस्तरपणे सांगितले. ३० डिसेंबर २०१९ मध्ये सुधींद्र राव यांची केएसपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती याच वायद्याने करण्यात आली होती की, १६ कोटींची रक्कम ते आपल्या कार्यकाळात चुकती करतील.

सुधींद्र राव म्हणाले की, ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही विकावी लागली. काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी केली. व्हिडिओ बातचीतमध्ये सुधींद्र राव यांनी दिलेल्या माहितीनुसार रोख ९.७५ कोटी रुपये मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे नातेवाईक मरईस्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आले.

तसेच ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी २०२० दरम्यान देण्यात आली. त्यानंतर मरईस्वामी यांनी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र आणि नातू शशिधर मार्डी, जवळचे नातेवाईक संजय श्री यांच्याशी सुधींद्र राव यांची भेट घालवून दिली. यावरूनच आता या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Team Global News Marathi: