धक्कादायक | आग्रीपाडय़ाच्या अनाथाश्रमात २२ मुलांना कोरोना संसर्गाची लागण

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता आरोग्यतज्ञांकडून व्यक्त केलेली असतानाच आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील १२ वर्षांखालील चार मुलांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या १२ मुले आणि ६ कर्मचाऱयांवर भायखळ्याच्या रिचर्डसन ऍण्ड क्रुडासमधील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली जात असून त्यातून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन मुले काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ई विभागाकडून या अनाथाश्रमात राहणाऱया सर्वांसाठी मंगळवारी आरोग्य चाचणी शिबीर राबवण्यात आले. या चाचणीत १६ मुलांना आणि ६ कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचे आढळले. दरम्यान, हा अनाथाश्रम मुंबई महापालिकेने सील केला आहे.

मुंबईत पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मुलांमध्ये कोरोना आढळला आहे. जी मुले निगेटिव्ह आली आहेत त्यांना अनाथाश्रमातच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून पालिका त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. त्याचबरोबर दर दोन दिवसांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाणार आहे.

Team Global News Marathi: