शिवसेनेनं थोपाटले दंड, पोस्टर्समधून शिंदे गटाला थेट इशारा

 

शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबद्दल उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मुंबई पालिकेनं अजूनही शिवसेनेला परवानगी दिलेली नाही. पण, शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. सेनेनं एक पोस्टर प्रसिद्ध केलं असून आता ताकददाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, असं म्हणत शिवसेनेनं डरकाळी फोडली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी आक्रमक झाली आहे. शिंदे गटाने सुद्धा दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे. पालिकेनं यावर कोणताच निर्णय घेतला नाही.

त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी मुंबई पालिकेवर धडक मारली होती. परवानगी देण्यास उशीर का केला जातोय, असा जाबच शिवसैनिकांनी विचारला. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरवर हिंदुत्वाची वज्रमुठ…आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही…असं म्हणत आक्रमकपणे शिंदे गटाला इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेच्या या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे तेजस ठाकरे हे सक्रीय राजकरणामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेचा आज मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांना मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

Team Global News Marathi: