मुंबई | आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील शिवाजी पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. शिवाजी पार्कचे फूटपाथ कायमस्वरुपी उजळलेले कंदील आणि रोषणाईत न्हाऊन निघणार आहेत. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती कायमस्वरुपी स्पॉटलाईटच्या दिव्यांचे प्रकाशझोत सोडले जातील. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, मीनाताई ठाकरे चौक यांचेही सुशोभिकरण होईल.
मात्र यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्त चहल यांना पत्र लिहिले आहे. शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली होती.
आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती.