शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरून दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; भाजपानं काढला चिमटा

 

शिवजयंतीनिमित्त शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो असलेले बॅनर्स संपूर्ण डोंबिवली शहरात झळकावले. यवरून आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने फार मोठी चूक केली असून आता शिवसेना हिंदुत्वाचा डीएनए विसरली असल्याची खोचक टीका भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. डोंबिवलीत घडलेल्या या प्रकारानंतर शिवसेनेवर भाजपाने टीकास्त्र सोडलं.

आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व उच्चपदावर असेलेल्या मंडळींचा पिंडच मुळात शिवसेनेचा नाही, दुसऱ्या पक्षातून उसनवार घेतलेली ही सर्व मंडळी आहेत. किंबहुना यांना हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे माहितच नाही. परंतु आज एखादा खरा शिवसैनिक त्या शिवसेना शहर प्रमुखासारख्या महत्वाच्या पदावर असता तर ही चूक घडली नसती. या बॅनरवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव असून आता तरी त्यांचे डोळे उघडले आहेत की नाही हे पाहण्याची गरज असा टोला त्यांनी लगावला.

तसेच आपल्या रक्तात श्वासात नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हीच आपली ओळख आहे, असं असताना आयाराम शिवसैनिक असणाऱ्या शहरप्रमुखांनी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर शंभूराजेंचे फोटो लावले. हिंदुत्वाचा मुखवटा घालून उसनवार लोक घेऊन शिवसैनिक बनवले असल्यानं हिंदुत्वाचा अस्सल डीएनए यांच्या रक्तात येईल कुठून असा सवालही आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला विचारला.

Team Global News Marathi: