या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.” – संजय राऊत

भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार तेव्हा आले असते तर ती काय नैसर्गिक युती होती?” संजय राऊतांचा सवाल

या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.” – संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका

पक्षात झालेली फूट आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदार, देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील मोदी सरकारवर टीका करत आहेत. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना खडेबोल सुनावत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये काय म्हणाले?

“इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत असते याची प्रचिती देणारा काळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. शिवाजी महाराजांचं नाव आपण घेत असतो. मराठ्यातील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेली ही स्थिती पाहून व्यथित मनाने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. दुही व विश्वासघात यांचे राजकारण त्या काळातही चालले. आजही चालले आहे. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी व जयंती, राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार आज कुणाला आहे?”

“चंदराव मोरे व गणोजी शिर्क्यांचेच राजकारण अजून चालू आहे. दिल्ल्लीच्या ज्या बादशहाच्या दरबारात मान वाकवायची नाही, या केवळ एका अभिमानाच्या मुद्द्यावर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्या दिल्लीच्या आजच्या दरबारात ‘आमचा महाराष्ट्रच नष्ट करा हो!’ म्हणून मराठेच शिष्टमंडळे घेऊन जात आहेत.”

“शिवसेनेतून एक गट दिल्लीने फोडला, तीच शिवसेना खरी असा आभास निर्माण केला जात आहे. शिंदे गटाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस ‘शिवसेना’ असा करतात. तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक वैर आहे हे समजू शकतो, पण फुटलेल्या गटास शिवसेना म्हणून संबोधणे ही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेइमानी आहे.”

राष्ट्रवादीबरोबर कोण?; शिंदे गटातील आमदारांना राऊतांचा सवाल

“शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली हे शिंदे गटातील काही म्होरक्यांना पटले नाही व त्यांनी हा दिव्य विचार जाहीरपणे बोलून दाखवला, पण त्यांचे ज्ञान कच्चे आहे. 2019 साली भाजपनेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सरकार स्थापनेचे प्रयत्न केले. शिंदे फुटले तसे तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार फुटले. राष्ट्रवादीबरोबर भाजपचे सरकार स्थापन केलेच जाणार होते, पण म्हणून राष्ट्रवादीमुळे भाजप संपला किंवा संपेल अशी बोंब भाजप आमदारांनी मारली नाही. भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार तेव्हा आले असते तर ती काय नैसर्गिक युती होती?”

“राजकारणात नैसर्गिक व अनैसर्गिक असे काहीच नसते. 2014 साली भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे विधानसभा लढले. निकालानंतर सरकार स्थापनेस विलंब झाला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः समोर येऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला व भाजपने हा पाठिंबा तेव्हा नाकारला नव्हता. भाजपला व मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांचे वावडे कधीच नव्हते.”

“भविष्यातील आव्हान ठरू शकतात म्हणून उद्धव ठाकरेंचे पाय खेचले”

“हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे आमदार शिंदे गटात गेले, त्यातील दीपक केसरकर, उदय सामंत हे आमदार तर पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र व दाखला घेऊन शिवसेनेत आले. त्यांना राष्ट्रवादीचा इतका द्वेष का असावा? येथे नैतिकतेचा विषय नाही, तर राजकीय स्वार्थ जास्त आहे. तळ्यात-मळ्यात हे राजकारण शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. शिवाजीराजांनी जयसिंगांशी तह व तडजोड केली, पण दिल्लीतील बादशहाच्या दरबारात मान तुकविली नाही.”

“दिल्ली व महाराष्ट्राचे नाते हे सदैव संघर्षाचे राहिले. तरी एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही की, महाराष्ट्राचे नेतृत्व स्वतंत्रपणे मोठे व्हावे हे दिल्लीने कधीच मान्य केले नाही. त्यांच्या छायेत व आश्रयातच तुम्ही वावरावे अशी त्यांची अपेक्षा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मुंबई, बेळगावच्या प्रश्नापर्यंत महाराष्ट्राची शक्ती वाढणार नाही, असा प्रयत्न दिल्लीने सतत केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करू शकतात, भविष्यात त्यांचे आव्हान उभे राहू शकते या भयातून शिवसेना फोडली व उद्धव ठाकरे यांचे पाय खेचले, हेच सत्य आहे.”

“शिंदे गटाच्या मदतीने भाजपला मुंबईवरील मराठी ठसा संपवायचाय”

“देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर वाढू नये म्हणून त्यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावले अशी चर्चा खुद्द भाजपमध्येच आहे. खरे-खोटे दिल्लीलाच माहीत! एकच अजेंडा! शिवसेना फोडावी व महाराष्ट्र दुबळा करावा या एकाच अजेंड्यावर सध्या काम सुरू आहे. या कारस्थानात स्वतःस बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणवून घेणारे लोक सामील झाले, हे बरोबर नाही.”

“महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील. यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक मुंबईची. शिंदे गटाच्या मदतीने भाजपला मुंबईवरचा मराठी ठसा संपवायचा आहे. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा आहे, तो उतरवायचा आहे. शिंदे गटास हे मान्य आहे काय? शिवछत्रपतींनंतर त्यांचा अभिमान बोलला तो फक्त लोकमान्य टिळकांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून. त्यानंतर महाराष्ट्राला तसा नेता लाभला नाही हे जुने दारुण सत्य पुन्हा सिद्ध झाले आहे इतकेच! महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण बट्ट्याबोळ होताना दिसत आहे. त्यात शिवसैनिक म्हणवून घेणारे सामील झाले याचे दुःख जास्त आहे.”

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: