शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत ; बंगळुरू दौरा रद्द; चर्चांना उधाण

शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत ; बंगळुरू दौरा रद्द; चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बंगळुरू दौरा रद्द केल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज बंगळुरूत विरोधकांची बैठक होत आहे. सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली होती. त्यानंतर आजच्या दुस-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु शरद पवार आजच्या बैठकीला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवार बंगळुरूऐवजी आज मुंबईतच थांबणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी हा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनानिमित्त शरद पवार आणि अजित पवार गटाचे दोन्ही आमदार आमनेसामने येणार आहेत.

अधिवेशनाच्या आधी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप विरोधी पक्षात असून ९ मंत्री वगळता पक्षाच्या इतर आमदारांची व्यवस्था विरोधी बाकांवर करावी अशी मागणी केली आहे. पक्षाचे आमदार अजित पवार गटात जाऊ नयेत यासाठी शरद पवार विशेष प्रयत्न करत आहेत.

आगामी २०२४ ची निवडणूक पाहता विरोधकांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच प्रत्यय पाटणा येथील बैठकीत आला. त्यानंतर विरोधकांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूत बैठक होत आहे. विरोधकांसाठी ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीचा मिनिट टू मिनिट अजेंडा निश्चित करण्यात आला आहे. विरोधी पक्षांना दिशा मिळावी यासाठी बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत. या २ दिवसीय बैठकीवर सर्वांचे लक्ष आहे. त्यात दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.

शरद पवार यांना विरोधी पक्षातील प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांसह ८ आमदारांनी थेट भाजपा-शिंदे सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कालच त्या सर्वांनी शरद पवार यांची वाय बी सेंटर येथे भेट घेतली आणि आज पवारांनी दौरा रद्द केला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: