शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्र्यांचं सूचक विधान

 

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत.त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, असे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.

राज्याचे कृषिमंत्री म्हणून पद संभाळल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. रविवारी पहाटे नांदेड तालुक्यातील कासारखेडा, नांदुसा येथे जात अतिवृष्टीने बाधित शेतीची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत त्यांनी नुकसानाची माहिती घेतली.

या पाहणी दौऱ्याचा आढावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देऊन शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन सुरू असल्याने बाहेर कोणतीही घोषणा करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी निश्चितच समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पीक विमा व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविले जातील, असे सत्तार यांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, कृषी, महसूल विभागांना उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वीच्या मदतीपेक्षा अधिकची मदत विद्यमान सरकारकडून करण्यात येईल. तसेच गेल्या वर्षीचे अनेकांचे अनुदान, नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसल्याची माहिती आमदारांकडून मिळाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक निधी आणि प्रलंबित प्रस्ताव तत्काळ कृषी खात्याकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: