पुण्यातील खड्डे दुरुस्तीबाबत आत्मपरीक्षण करा,मनसेचा सत्ताधाऱ्यांना सल्ला

 

पुणे शहरातील रस्त्याची पावसाने अक्षरश अक्षरक्ष: चाळण केली आहे. आज रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. तरीही शहरातील ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत ११ हजार ७०६ पैकी ११ हजार ४१८ खड्डे बुजविण्यात आले असून, शहरात केवळ २८८ खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. पालिकेचा हा कारभार अजब आणि पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही.

अशातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र, ही कामेही निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली.

Team Global News Marathi: