“उठ-सूट राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपाला… रोहित पवारांनी लगावला टोला |

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यात सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यासाठी सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत.

तसेच सर्व्हेमध्ये जवळपास ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असून, त्यांना पुन्हा मतदान करू असे म्हटले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे आघाडी सरकारचं यश असल्याचं देखील म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.

“‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील 13 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे #मविआ सरकारचं यश आहे” असं म्हटलं आहे.

तसेच ठाकरे सरकारवर होत असलेल्या टीकेवरून भाजपाला सणसणीत टोला देखील लगावला आहे. “उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपाला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपाकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरू नये!” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: