क्रमश: मन आणि शरीराचे खेळ ;चाळिशीतील वावटळ…!

क्रमश: मन आणि शरीराचे खेळ ;चाळिशीतील वावटळ…!

सरीता खिडकीपाशी उभं राहून रोहीतची वाट बघत होती. रोहितची ट्युशन वरून परत यायची वेळ झाली होती. आज तो चारलाच येणार होता आणि नेमका पंकजचा फोन आलेला की तो पाच वाजल्यापासून मोकळाच आहे. रोहित हा सरिता आणी राकेशचा एकुलता एक मुलगा ! आता तिला प्रश्न पडला की रोहीतला दोन तास कूठे अडकवून ठेवावं. क्षणभर तिला लाजच वाटली स्वतःची, हे काय करतोय आपण? गेल्या काही दिवसांपासून काय झालंय आपल्याला! नववीत असलेल्या,वयात येणार्या मुलापासून लपवून काय करतोय आपण! का हा अट्टहास!? हे सगळं जर रोहीत ने पाहिलं तर काय विचार करेल तो?

 

 

आपली आई अशी इतकी वहावत चाललेली पाहून काय वाटेल त्याला? छे छे! काय चाललंय आपलं; आयुष्यभर कधी परपुरूषाकडे डोळे वर करून पाहिले नाही आपण आणि आता या वयात हे काय चाळे सूचतायंत!

पण हे शरीर पण बंड करून उठतंच ना सारखं.
सारखी आग का लागलेली असते यात..
कधीच विझत नाही, का होतंय हे असं??
तसं सरीताचा नवरा तिच्या पेक्षाही उजवा, छानच. लग्नानंतर बरीच वर्षं सुख दिलं त्याने तिला.थोडा गरिबीत पण चांगला संसार केला.

 

तीन खोल्या होत्या रहायला पण आताशा थकून जायचा तो लवकर. प्रायव्हेट कंपनीत लोड खूप. तरी त्याने सरीताला नोकरीच्या जोखडात बांधलं नाही.स्वतः कष्ट करून संसार उभारला. पण आताशा त्याचा रसिकपणा कमी झाल्या सारखा वाटायचा तिला. मित्र मंडळीतच रमायचा. कधीतरी दोन चार पेग,मित्रांबरोबर पार्टी एवढंच काय तो!तीही मग दुर्लक्ष करायची की जाऊदे राबतोय ना तो घरासाठी, मग थोडी मजा करू दे की! पण त्याचं लक्ष कमी होऊ लागलं तिच्याकडे हळूहळू.

त्यात आता रोहीत मोठा होत होता. तो आणि राकेश कॉटवर झोपत असत आणि सरीता गादी घालून खाली जमिनीवर. खूपदा तिला जूने दिवस आठवत. अगदी नवीन असतांना ती राकेशला सोडून झोपूच शकत नसे रात्रीची. त्याच्या मिठीत उबदार वाटे तिला. खूप छान. तोही बिलगून झोपायचा तिला.फार आश्वस्त आणि सेक्युअर्ड वाटायचं तिला. पण रोहीत मोठा होऊ लागला तसंतसं त्यांच्यात अंतर वाढू लागलं.

 

 

दिवस भर राकेश कामाला बाहेर आणि रोहीत त्याच्या व्यापात. सरिताला दिवस खायला उठे. त्यात तिचं शरीर आता जास्तच भरत चाललेलं, नव्या नव्हाळी सारखं!

तिची तहानच भागेना झाली तिला कळेना काय होतंय. अख्खा दिवस तिच्या अंगावर यायचा; टीव्ही तरी बघून किती बघणार. शिवाय तिला मैत्रीणीही नव्हत्या फारशा अबोल असल्यामुळे! माहेर बरंच लांबचं.आणि त्यात आता हे दिवसेंदिवस ‘डिमांडींग’ होत चाललेलं शरीर!

तिच्या शरीराचं तिला नवलच वाटत होतं. इतकी वर्षं खाऊ पिऊ घालूनही त्याची भूक कायमच कशी दिवसेंदिवस वाढतच चाललेली. शिवाय वयाने आलेली स्थिरता, घेतलेली काळजी यामुळे तिचे अवयव जास्तच वळणदार, भरीव होत चाललेले विचीत्रच !

एकदा संध्याकाळी अशीच ती टीव्ही बघत बसलेली; रूषी कपूर आणि डिंपलचं sensational song सुरु होतं – जाने दो ना..! पुर्ण भिजलेली, टंच डिंपल आणि काहीसा केवळा रूषी कपूर! त्यांची लाडीक झटापट पाहून तिच्या अंगावर रोमांच येत होते. तिला तीव्रतेने वाटलं की आत्ता राकेश जवळ हवा होता.पण तो तर कामावर गेलेला. इतक्यातच दारावरची बेल वाजली,आत्ता कोण आलं म्हणत तिनं दार उघडलं तर समोर राकेशच! काहीतरी कारणामुळे तो आज लवकर आला होता. तिचा आनंद गगनात मावेना. तिने दार लावलं आणि त्याला घट्ट मिठीच मारली तसं तिला काहीसं झिडकारतच तो म्हणाला अगं काय हा वेडेपणा मला फ्रेश तरी होऊ दे आणि माझा स्वैपाक करू नकोस,पार्टीला जायचंय मला मित्राकडे पटकन आवरून!

ती पार हिरमुसली झाली. तिचा विरसच झाल. तिने चूपचाप त्याचं गरम पाणी काढलं आणि चहा ठेवला.तो वैतागून टीव्ही बंद करत म्हणाला हे काय पहात असतेस दिसभर! हे वय आहे का तुझं हे असलं पहायचं?? भावना चाळवतात याने, त्यापेक्षा महिला मंडळ जॉईन कर एखादं. वेळ बरा जाईल,चार बायकांशी ओळखी होतील! तिलाही पटलं ते. खरंच नकोच बघायला हे असलं, वये का आपलं आता? हल्ली बिघडत चाललोय का आपण? कुठेतरी मन गुंतवायला हवं पण जॉब तर राकेश करूच देणार नव्हता..

मग..महीला मंडळ..?नकोनको तिथं रिकामटेकड्या शिष्ट बायका.. नटणं मुरडणं आणि गॉसीपींग करणार्या.. नकोच. मग तिला अचानक आठवलं की जवळच कॉम्पुटर क्लासेस सुरु झालेत. सुशिक्षित महिलांसाठी काही चांगले कोर्सेस होते तिथे. तेच जॉईन करावे नवीन काही शिकायला मिळेल. वेळही चांगला जाईल आणि महत्वाचं म्हणजे हे शरीर तरी गप्प बसेल. मग संध्याकाळीच ती क्लासचा तपास करून फीस आणि टायमिंग विचारून आली आणि दूसर्या दिवशी राकेशची परमिशन घेऊन तिने क्लास जॉईन केला.

क्लासची वेळ ही सोयीस्कर होती दुपारी तीन तास. तरी तीच्याकडे बराच वेळ असे कारण रोहीत शाळेतून आला की लगेच चारला ट्युशनला जाई आणि सहा साडेसहाला येत असे. तिच्याकडे बर्यापैकी मोकळा वेळ असे.

क्लासच्या पहिल्या दिवशी ती मोठ्या उत्साहाने निघाली.सलवार कमीज, घड्याळ आणि लांबसडक वेणी!
खूप दिवसांनी ती अशी बाहेर पडत होती.
खूप आनंदात होती ती.क्लास तसा जवळच होता म्हणजे पायी थोडा लांब पण ती पायीच निघाली रमत गमत क्लासमधे पोचली. तिच्या सारख्याच बर्याच गृहीणी आलेल्या होत्या.त्यांचा चिवचिवाट चाललेला पाहून तिला एकदम फ्रेश वाटलं.

एक दोघींशी जूजबी बोलून ती कामाला लागली.
एवढ्यात तिला आवाज आला की नवीन सर आले, नवीन सर आले बहूतेक कूणीतरी नवीन जॉईन झालेलं. एवढ्यात एक सुंदर fregrence तिच्या नाकाला जाणवला. कूठला बरं perfume.. हा म्हणत तिला नाव आठवेना. पण वास खूप छान येत होता.

त्या पाठोपाठ पंकज सर आले!
सर कसले 26- 27 वर्षांचा तरूण मुलगाच!
बर्यापैकी गव्हाळवर्णीय, सहा फूट उंच, कमावलेलं पिळदार शरीर, केसांच्या बटा कपाळावर रूळताय,अत्यंत धारदार नाक आणि नाजूक पातळ ओठ जणु दगडात कोरलेलं रेखीव सुंदर शिल्पच…!
ती थोड्या वेळ त्याच्याकडे बघतच बसली. सैल टी शर्ट आणि जिन्स मधे जास्तच रांगडा वाटत होता. एका हाताने केस बाजूला सारत त्याने बोलायला सुरूवात केली. अहाहा! काय छान आवाज होता त्याचा अगदी खर्जातला!
त्याने सांगितलं की त्याचं इंजिनियरिंग नुकतंच पूर्ण झालंय आणि दूसरा चांगला जॉब मिळेपर्यंत तो हा जॉब करणार होता.

क्रमश….
( चाळिशीतील वावटळ – पहिला भाग)

प्रसाद

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: