‘भाजयुमो’ जिल्हाध्यक्षासह चौघे तडीपार -पोलीस आयुक्तांची कारवाई

नागरिकांच्या अडचणीचा फायदा घेत, त्यांना मारहाण करत, नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ऊर्फ मुकेश सदाशिव घोडके (वय २६, रा. दमाणीनगर, गडदर्शन) याच्यावर व त्याचा भाऊ गोपीनाथ सदाशिव घोडके (वय ३१, रा. दमाणीनगर) याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तसेच असेच विविध गुन्हे दाखल असलेल्या बजरंग देवीदास जाधव (वय ५१), गोविंद ऊर्फ बाळू देवीदास जाधव (वय ३१, दोघे रा. गडभैरव कॉलनी, दमाणीनगर) या चौघांना पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी त्यांनी काढले.

भा.यु.मो.चे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके यांच्यावर सोलापूर शहर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात घोडके हा आपल्या साथीदारासोबत नागरिकांना जास्त व्याजदराने पैसे देणे, नागरिकांनी वेळेवर व्याज दिले नाही, तर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या मालमत्तेवर कब्जा घेणे, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, टोळीच्या माध्यमातून दंगा करून सामान्य नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर व त्याचा भाऊ गोपीनाथ घोडके याच्यावर दाखल आहेत.

तसेच शहरामध्ये आपल्या साथीदारांसोबत नागरिकांना शिवीगाळ करत मारहाण करणे, दमदाटी करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दंगा व मारामारी करणे, घरफोडी चोरी करणे, टोळीच्या माध्यमातून दंगा करत सामान्य नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे बजरंग जाधव व गोविंद जाधव यांच्यावर दाखल आहेत.

यामुळे वरील चारही आरोपींना सोलापूर शहर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: