नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत मोर्चा

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता. मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा आता आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा होणार आहे.

सदर मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. याचबरोबर शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत. फक्त आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपने लावले आहेत. साडे दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येत नाही हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे. केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

तसेच पुढे बोलता ते म्हणाले की, जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी ठाम भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतली आहे.

Team Global News Marathi: