राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते; भाजप नगरसेविकेची महापौर किशोरी पेडणेकरांवर टीका

 

मुंबई – राणीबागेत मंगळवारी पेंग्विनच्या पिल्लाचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी त्याला देण्यात आलेल्या इंग्रजी नावांवरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. यावरून मुंबईत चांगलेच राजकारण सुरू झाले होते. यावेळी पेंग्विनला ‘ऑस्कर’ हे इंग्रजी नाव दिल्यावरून भाजपने टीका केली.

यामुळे महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आणि त्यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना, पुढच्या वेळी हत्तीच्या पिलाला चंपा, तर माकडाच्या पिलाचे नाव चिवा ठेवू, असे म्हटले होते. त्यांचा रोख नेमका चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर होता. यानंतर आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही पेडणेकरांवर खोचक टीका केली आहे.

मुंबईत सुरू झालेल्या नेत्यांच्या या शाब्दिक युद्धात भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही उडी घेतली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी एक ट्विट केले आहे. यात, “ओळखा पाहू कोण ??? असे म्हणत, राणीच्या बागेत नांदते, हत्ती सारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि अख्खी फाईलच गिळते,” असे शिरवाडकर यांनी म्हटले आहे

Team Global News Marathi: