घरबसल्या नोंदवा पिकांची नोंद ; महसूल विभागाचा उपक्रम

घरबसल्या नोंदवा पिकांची नोंद ; महसूल विभागाचा उपक्रम

सोलापूर, दि.३०: शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याच्या पारंपरिक पध्दतीमध्ये महसूल विभागाने आता बदल केला आहे. आता स्वतः शेतकरी मोबाईलवरून ई-पीक पाहणीची नोंदणी करू शकणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी ई-पीक पाहणी दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

महसूल विभागाने टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने स्वतंत्र ॲप्लीकेशनची निर्मिती केली आहे. या अप्लिकेशनमुळे आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. “ई-पीक पाहणी” ॲप्लीकेशन अंतर्गत शेतकरी स्वत:च पिकांची माहिती भरतील. ही माहिती तलाठी तपासून घेतील. पीक पेरणीची रिअल टाईम माहिती ॲप्लीकेशनमध्ये संकलित होणार असून यामध्ये पारदर्शकता येणार आहे. यामुळे पीक विम्याशी संबंधित दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची अचूक आकडेवारी, राज्यातील पिकांचे एकूण क्षेत्र याची माहिती मिळण्यास या ॲप्लीकेशनमुळे मदत होणार आहे.

याबाबत अधिक माहिती ई-पीक पाहणीचे जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आता शेतकऱ्याला आपल्या पिकांची नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. यामुळे शेतकरी सक्षम होण्याबरोबरच एक पारदर्शक डाटा तयार होण्यास मदत होणार असून हा डाटा कृषीविषयक अन्य योजनांसाठी वापरणे सुलभ होणार आहे.

सुरुवातीस राज्यातील सहा जिल्हयांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्ट, २०२१ रोजी “ई-पीक पाहणी” या प्रकल्पाचे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी लोकार्पण केले.

“ई-पीक पाहणी” कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने राज्य, जिल्हा, तालुका निहाय सनियंत्रण समित्या गठीत केल्या असून भूमी अभिलेख पुण्याच्या संचालक यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष सुरु करण्यात आला आहे.

२ सप्टेंबरला ई-पीक पाहणी ॲप्लीकेशनबाबत ग्रामस्तरावर प्रचार, प्रसार व प्रशिक्षणाद्वारे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, गावातील स्वयंसेवक, कृषि सेवा केंद्रे, गणेशोत्सव मंडळे यांचे सहकार्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्हयामध्ये सुमारे 10 लाख शेतकरी खातेदार असून “ई-पीक पाहणी” कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप्लीकेशनवर नोंदणी करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: